अखेर अँटिजेन टेस्टला सुरुवात, ४ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:36 PM2020-07-28T22:36:36+5:302020-07-28T22:37:24+5:30
१५ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणे शक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तात्काळ कोरोनाचा अहवाल देणारी अँटिजन टेस्ट ची येथील जिल्हा रूग्णालयात सुरूवात करण्यात आली. अँटिजेन टेस्टमुळे १५ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणे शक्य होणार आहे.
अँटिजेन टेस्टचे किट प्राप्त होऊनही चाचण्यांना प्रारंभ झाला नव्हता. याबाबत लोकमतने, तात्काळ अहवाल देणारी अँटिजेन टेस्टची प्रतीक्षा या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हा रूग्णालयात अँटिजेन टेस्टला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी ५० रूग्णांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी चार रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ४६ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना या विषाणूजन्य आजाराने धुमाकूळ घातलेला आहे़ अनलॉकच्या टप्प्यात तर या महामारीने कहर माजविला आहे़ दररोज शंभराहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत़ मृतांच्या आकडेवारीने देखील शंभरी गाठली आहे़ कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारावर कधीच गेलेला आहे़ हिरे वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाग्रस्त रुग्णांनी फुल्ल झाले आहे़ स्वॅब घेतल्यानंतर संबंधितांना दोन ते तीन दिवस अहवालाची वाट पहावी लागत होती़ त्यामुळे बाधितांच्या संपर्कातील लोकांचा जीव देखील टांगणीला लागायचा़ आता मात्र तसे होणार नाही, असे चित्र सद्या दिसून येत आहे़
७ जुलै पासून १००० ‘अँटीजेन टेस्ट’किट उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी जिल्हा रुग्णालय व मनपा आरोग्य विभागाला प्रत्येकी ५०० किट प्राप्त झाले आहेत. मात्र प्रयोगशाळा व तांत्रिक प्रशिक्षणा अभावी ‘अँटीजेन टेस्ट’रखडली होती़ आता असे होणार नाही़
धुळ्यात कोरोना निदानाच्या अँटिजेन चाचणीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे़ डॉ़ विशाल पाटील हे अँटिजेन चाचणी घेत आहेत़