अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून दिली आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:59 AM2019-09-05T11:59:37+5:302019-09-05T11:59:56+5:30
ज्ञानज्योती भदाणे : नगाव, धमाणे येथील नुकसानग्रस्तांचा समावेश
धुळे : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नगाव व धमाणे येथील नुकसान झालेल्या घरांची पंचायत समितीच्या माजी सभापती व नगावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांनी नुकतीच पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतही दिली.
तालुक्यातील नगाव व धमाणे येथे नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक लोकांच्या घरा५ँ पडझड होऊन नुकसान झाले. या नुकसान झालेल्या घरांची बुधवारी धुळे पंचायत समितीच्या माजी सभापती तथा नगाव गावाच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती मनोहर भदाणे यांनी नगाव व धमाणे गावात भेट देऊन पाहणी केली. यावेळी धमाणे गावातील हिरालाल राजधर पाटील यांच्या घराचे झालेले नुकसानाची पाहणी करून सरपंच भदाणे यांनी त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी गावाचे मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांना तात्काळ पंचनामा करण्याचे निवेदनही ज्ञानज्योती भदाणे यांनी दिले.
यावेळी धमाणे गावाचे सरपंच रमेश बैसाणे, वि.का.सो.चेअरमन माधवराव झेंडा शिरसाठ, नामदेव शिरसाठ, विनोद वाघ, नगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी एस.पी. पाटील, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सी.यु. पाटील, तलाठी हिरालाल माळी, संदिप मोरे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.