पोलीस, आरोग्य सेवकात देव शोधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:06 PM2020-04-10T22:06:31+5:302020-04-10T22:06:58+5:30
-भागवताचार्य राजीव झा, धुळे
कोरोना विषाणुमुळे संपूर्ण विश्व हादरलेले आहे. त्यामुळे मराठी नूतन वर्ष गुढीपाडवा, राम नवमी, हनुमान जयंती सारखे सण, उत्सव, लग्न समारंभ रद्द करण्याची वेळ आली. या काळात देवस्थानाचे द्वार बंद झाले असले तरी देव हे मंदिर सोडून प्रत्येक सैनिक, पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचाऱ्यांच्या रुपात संपूर्ण देशात दिसत आहे. मंदिरातील एक रुपया चढवलेला करोडो बनून लक्ष्मी रूप धारण करून, देशसेवेसाठी व भक्तासाठी सरसावली, नारायण स्वरूप विश्व पोषण करणारे प्रत्येक भक्त रुपात गरजू लोकांचे भोजन, माता अन्नपुर्णा रुपात अन्न वाटप होत आहे. वैद्य स्वरुपात भगवान धन्वंतरी रोगी लोकांचा आजार दूर करण्यासाठी झटत आहेत, रुद्राक्षणाय खल निग्रहनाय म्हणून पोलिस प्रशासन भर उन्हात शिव रूप तपस्या करत, समाजकंटकांना दंडित करीत आहेत, जीवनावश्यक उत्पादन करणारे ब्रम्हाजी स्वरुपात निर्माण करतात, हाच माझा सनातन धर्म व परपंरा आहे.
राष्ट्रप्रेमी मित्रांनो कोरोनाला घाबरू नका, घरात राहून देशसेवा, धर्मसेवा, समाजसेवेचा योग जीवनात आला आहे. आपले कर्तव्य गरजूच्या मदत रुपात करा, देवाला नैवेद्य समजून दिन, हीन लोकांना भोजन द्या, परिवारासाठी पैसा कमावला परंतू वेळ देऊ शकलो नाही, त्यामुळे या काळात संस्कृती, संस्कार, स्मृती, राष्ट्रसेवा, सेवा याबद्दल चर्चा करा, नित्य उपासना करून नैराश्य दूर करा, योगासन करून शरीर सुदृढ होऊ द्या, राज्य व केंद्रशासनाचे खच्चीकरण न करता त्यांची मानसिक हिंमत वाढवा. नेहमी नाण्याच्या दोन बाजू असतात तसे या कोरोनाची एक बाजू वाईट तर दुसरी बाजू कुठेतरी चांगली आहे. या लॉकडाउनमुळे कुठेतरी जागतिक पर्यावरण समस्या थांबली आहे. व्यर्थ इंधन व्यय, आर्थिक व्यय, आटोक्यात आहे, विषाणुमुळे होणारे मृत्युदर जरी वाढले असतील तरी वाहन यात्रा कमी असल्याने दुर्घटना, हत्यासारखे मृत्युदर कमी आहे, सगळे घरी असल्यामुळे चोरी, घातपात आदी अपराध कमी होत आहेत. महत्वाचे म्हणजे सगळे आपले आपल्या जवळ आहेत. निसर्गाचा मानवाने अपमान केला. आता तरी यामुळे निसर्गरूपी परमात्म्याची सेवा करा, राष्ट्रदेव भव म्हणून स्वदेशी वस्तू, विचार वापरून देशाला सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प करु, मानवता जागृत करुन मानव धर्म पालन करु तोच खरा भारतीय, खरा प्रभु भक्त ठरेल, शेवटी एकच बाहेर देवाला शोधण्यापेक्षा आपल्यातील देवाला जागृत करा.
-भागवताचार्य राजीव झा, धुळे