वर्षी येथे औषधी दुकानात आग; लाखोंचे नुकसान; सव्वातासानंतर आगीवर नियत्रण मिळविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 08:25 PM2023-04-11T20:25:06+5:302023-04-11T20:25:31+5:30
आगीत पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शिंदखेडा (जि.धुळे) : तालुक्यातील वर्षी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास औषधी दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील औषधी साहित्य जळून खाक झाले. सव्वातासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत आगीची नोंद करण्यात आलेली नव्हती.
वर्षी येथील रवींद्र जैन हे सकाळी ११ च्या सुमारास औषधी दुकानात असताना त्यांना अचानक जळाल्याचा वास येऊ लागला. बाहेर कोणीतरी काही तरी कचरा जाळला असेल असे त्यांना सुरुवातीला वाटले. मात्र, जळाल्याचा वास जास्त येत असल्याने ते वरच्या मजल्यावर गेले असता तेथे त्यांना आगीने रौद्र रूप धारण केल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ, तसेच त्यांचे भाऊ दिलीप जैन हे धावत आले. त्यांनी लगेच घराजवळ असलेला ट्यूबवेल सुरू करून आगीवर पाणी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठी असल्याने ती वाढतच गेली.
गावातील नागरिकांनी शिरपूर पालिकेला फोन करून आगीची कल्पना दिली. पाऊणतासात अग्निशमन बंब दाखल झाला. त्यानंतर शिंदखेडा येथूनही पाण्याचा बंब आला. दोन्ही बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी वर्षीचे डी. आर. पाटील, सरपंच सुरेश माळी आदी उपस्थित होते. आगीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
झोपडीला आग-
गावातील गंगूबाई भाईदास भिल यांच्या झोपडीला सोमवारी मध्यरात्री आग लागली. आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीची नोंद करण्यात आली नाही.