आगीमुळे दोन शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:45 AM2021-04-30T04:45:40+5:302021-04-30T04:45:40+5:30

दोंडाईचापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या रहिमपुरे गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. शेतीवर सर्वांचा उदरनिर्वाह चालतो. काका निंबा ...

The fire devastated two farming families | आगीमुळे दोन शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त

आगीमुळे दोन शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त

Next

दोंडाईचापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या रहिमपुरे गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. शेतीवर सर्वांचा उदरनिर्वाह चालतो.

काका निंबा नथा पाटील व पुतण्या विश्वास गोरख पाटील हे शेजारी राहतात. दोघांचा ओटा एक व सामायिक भिंत असलेले घर. बुधवारी रात्री सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन्ही घरे भस्मसात झाली.

बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर अंगणात फिरत असताना शेजाऱ्यांना निंबा पाटील यांचा घरातून धूर येताना दिसला. लगेच साडेनऊच्या दरम्यान मोठा सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी गावातून पाणी आणले. दोंडाईचा-शिंदखेडा येथील अग्निशमन बंब आलेत, तरीही आगीच्या रौद्र रूपापुढे कोणाचे काहीही चालले नाही. आगीत निंबा पाटील यांचे राहते घर, रोख रक्कम, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज, घर सामान, धान्य, पेरण्यासाठी ठेवलेले हरभरे जळून खाक झाले. त्या दाम्पत्याच्या अंगावर उरले त्यांचे फक्त कपडे. होत्याचे नव्हते झाले. नातेवाईक व गावकऱ्यांनी आज त्यांना मदत केली; पण उद्याचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

त्यांचे शेजारी नात्याने पुतणे विश्वास गोरख पाटील दोंडाईचाला मका फॅक्टरीत कामाला आहेत. आगीत दीड लाख रोकड, सोन्याचे दागिने, चक्की, फ्रीज, टीव्ही, घरगुती साहित्य, खरीप पेरणीला घेतलेले रासायनिक खत, शिलाई मशीन, फॅन जळून खाक झाले. शून्यापासून पुन्हा सर्व उभे कसे करावे, असा प्रश्न त्यांचापुढे पडला आहे. आज राहायला घर नाही, खाण्यास धान्य नाही, अंगाला कपडे नाहीत, पुढील आयुष्य जगायचे तरी कसे, हा प्रश्न पडला आहे. शासनाने या दोन्ही कुटुंबांना मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

घर बांधण्याचे स्वप्न झाले खाक...

६५ वर्षीय निंबा पाटील व ६० वर्षीय सुमन पाटील या वयोवृद्ध दाम्पत्यास मूलबाळ नाही. पुढील आयुष्यात पैसे उपयोगी पडावे म्हणून काबाडकष्ट करून त्यांनी शेतीवर राबराब राबून पैसा जमा केला. हरभरा विकून व विकास सोसायटीतून पीक कर्ज काढून घरात सात लाख रुपयांची रोकड ठेवली होती. यातून ते घर बांधणार होते व उर्वरित रक्कम पुढील आयुष्यासाठी साठवून ठेवणार होते. उतार वयात पैशाचा आधार असावा म्हणून ते रोख पैसे घरातच साठवत होते.

Web Title: The fire devastated two farming families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.