प्रथमोपचार पेटीचा उडाला बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:11 PM2019-04-12T17:11:56+5:302019-04-12T17:12:37+5:30
राज्य परिवहन महामंडळ : धुळे आगाराची स्थिती, जुन्या बसेसकडे दुर्लक्ष, नव्या बसेसमध्ये दिसतेय पेटी
धुळे : राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेसमध्ये प्रथमोपचार पेटीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो़ परिणामी योजनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे समोर येत आहे़ त्याचवेळेस मात्र काही नव्या बसेसमध्ये ही पेटी प्रकर्षाने दिसत आहे़ त्याच्यातही आवश्यक ती साहित्य आहे का? हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न चर्चेत आला आहे़ ‘लोकमत’ सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली़
सर्वसामान्य नागरीकांसाठी जीवनदायी ठरलेली राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे़ बसचा कुठे अपघात झाला आणि बसमधील प्रवाश्याला किरकोळ दुखापत झाली तर तातडीने त्या प्रवाश्यावर प्रथमोपचार व्हावेत असा दूरदृष्टीकोण ठेवून प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आली होती़ ही योजना ज्यावेळेस अंमलात आली त्यावेळेस प्रत्येक बसमध्ये अशाप्रकारची पेटी दिसत होती़ काही वेळेस काही ठिकाणी अशा पेटीचा प्रवाश्यांना उपयोग देखील झाला होता़ मात्र, कालांतराने याच प्रथमोपचार पेटीकडे दुर्लक्ष झाले़ आजच्या स्थितीत ज्या बसेस जुन्या आहेत त्याठिकाणी प्रथमोपचार पेटी दृष्टीस पडत नाही़ तर त्याचवेळेस काही नव्या बसेस धुळे आगारात दाखल झाल्याने त्यात मात्र अशा पेट्या दिसतात़ आता या पेट्या किती दिवस टिकतील, हाच खरा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असल्याचे समोर येत आहे़