पहिल्या दिवशी २४० जणांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:16 PM2020-01-28T12:16:32+5:302020-01-28T12:17:16+5:30
शिवभोजन योजना कार्यान्वित : पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनीही घेतला आस्वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :राज्य शासनाच्या ‘शिवभोजन’ या १० रूपयात जेवण देण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा २६ जानेवारीपासून प्रारंभ झालेला आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या योजनेचे उदघाटन झाल्यानंतर पालकमंत्रीसह जिल्हाधिकाऱ्यांनीही ‘शिवभोजन’चा आस्वाद घेतला. दरम्यान पहिल्या२४० जणांनी या योजनेचा लाभ घेतला.
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्याची महत्वकांक्षी योजना राज्य शासनाने सुरु केली आहे.
धुळे जिल्ह्यात शिव भोजन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याअंतर्गत धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील शेखर पांडुरंग वाघ यांच्या शिव भोजन केंद्राचे उदघाटन पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सत्तार,जिल्हाधिकारी गंगाथरन डी., हिलाल माळी यांनीही शिवभोजन घेतले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी आदी उपस्थित होते.
धुळे शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, डॉ.भाऊसाहेब हिरे मेडीकल कॉलेज, तसेच मध्यवर्ती बसस्थानक अशा एकूण चार ठिकाणी ही योजना सुरू झालेली आहे. पहिल्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीत ६१, हिरे वैद्यकीय महाविद्यालयात २९, व बसस्थानकात १५० अशा एकूण २४० जणांनी पहिल्या दिवशी याचा लाभ घेतला.
ही केंद्रे दुपारी १२ ते २ या कालावधीत सुरू राहतील. या भोजनात दोन चपाती, एक वाटी भाजी, एक मूद भात, एक वाटी वरणाचा समावेश आहे.