पुत्राची भागवत कथा ऐकून परतताना मातेसह पाच ठार; धुळ्यात भरधाव पिकअपची व्हॅनला धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 05:55 AM2024-09-16T05:55:27+5:302024-09-16T05:55:55+5:30
मृतांमध्ये कथाकारांच्या आईचा समावेश आहे, तर चार जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिंदखेडा (जि. धुळे) : तालुक्यातील वारूड येथे आयोजित भागवत कथेला कथाकारासोबत असलेले त्यांचे सोबती व्हॅनमधून शिंदखेडा येथे परतत असताना होळ-दसवेल मार्गावर रात्री दीड ते दोन वाजेदरम्यान समोरून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात व्हॅनमधील पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये कथाकारांच्या आईचा समावेश आहे, तर चार जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिंदखेडा येथील दीनानाथ देसले हे संगीतमय भागवत कथा करतात. त्यांची शनिवारी वारूड (ता. शिंदखेडा) येथे गणेश मंडळाने एक दिवसाची भागवत कथा ठेवली होती. त्यांच्यासोबत भजन गायक, वादक, हार्मोनियमवादक ही साथ देणारी मंडळीदेखील होती. कथा संपल्यावर ही मंडळी व्हॅनमधून परत शिंदखेडाकडे निघाली. त्यावेळी हा अपघात झाला.
मयुरी पितांबर परदेशी (वय २७), विशाखा (वृषाली) आप्पा माळी (१७), मंगलाबाई लोटन देसले (६०, सर्व रा. शिंदखेडा), सुनील दंगल कोळी (३२, रा. परसामळ), व्हॅनचालक जयेश गुलाब पाटील बोरसे (२३) अशी मृतांची नावे आहेत. मृत मंगलाबाई देसले या भागवत कथाकार दीनानाथ देसले यांच्या मातोश्री होत.