पाच लाखांची रोकड पोलिसांनी केली हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 08:52 PM2019-10-12T20:52:04+5:302019-10-12T20:52:29+5:30
पळासनेर नाका : रकमेची चौकशी सुरु
शिरपूर : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांनी शुक्रवारी रात्री एका वाहनातून बॅग पकडली आहे़ या बॅगेत ५ लाखांची रोकड होती़ या रकमेसंदर्भात अधिक चौकशी शिरपूर तालुका पोलिसांकडून सुरु आहे़ घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली़.
विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या आदेशानुसार अवैध दारु, शस्त्र व रोख रक्कम हस्तगत करण्याबाबत विशेष मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे़ अशा प्रकारच्या कारवाईसाठी महाराष्ट्रात प्रवेश करणाºया मार्गावर आंतरराज्यीय सीमा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत़ त्यापैकी एक आंतरराज्यीय तपासणी नाका शिरपूर तालुका पोलीस ठाण्यातंर्गत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर सीमा तपासणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे़ ११ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक खैरनार, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर, पोलीस कर्मचारी लक्ष्मण गवळी, संजय देवरे, राजेंद्र मांडगे, योगेश दाभाडे हे नाक्यावर वाहनांची तपासणी करत असताना एमएच १८ - ९०९९ क्रमांकाचे वाहन दाखल झाले़ या वाहनाची तपासणी करत असताना वाहनात एक बॅग आढळून आली़ या बॅगेत ५ लाखांची रोकड आढळून आली़ या वाहनात असलेले युवराज अरविंद शिंदे (रा़ कॉटन मार्केट, धुळे) यांनी पकडण्यात आलेली रक्कम त्यांची असल्याचे सांगितले आहे़ जप्त केलेली रक्कम पोलिसांनी पंचनामा करुन जप्त केली आहे़.
दरम्यान, युवराज शिंदे यांच्या ताब्यातील ५ लाखांची रक्कम ही त्यांचे सांगण्यानुसार व्यवसायाशी संबंधित आहे, असे प्राथमिक चौकशीत लक्षात येत असलेतरी युवराज शिंदे यांच्याकडून रोख रक्कमेसंबंधाने अधिक पुरावे, अभिलेख आणि संबंधित दस्तावेज मागविण्यात आले असून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यातंर्गत चौकशी सुरु आहे़ असे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी सांगितले़ युवराज शिंदे हे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सरहद्दीवरील बिजासनी मातेच्या दर्शनासाठी आले होते़. दर्शन करून ते धुळ्याकडे जात असतांना महामार्गावरील पळासनेर गावाजवळ ही गाडी अडविली असता सदर घटना उघडकीस आली़.