धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू; नरडाणा, मोहाडी, साक्री, धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद

By देवेंद्र पाठक | Published: January 16, 2024 04:57 PM2024-01-16T16:57:02+5:302024-01-16T16:57:24+5:30

जिल्ह्यात वेगवेगळ्या पाच ठिकाणी अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला.

Five people died in different incidents in the district dhule | धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू; नरडाणा, मोहाडी, साक्री, धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद

धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू; नरडाणा, मोहाडी, साक्री, धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद

धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या पाच ठिकाणी अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. यात नरडाणा, मोहाडी आणि साक्री पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक आणि धुळे तालुका पोलिस ठाण्यात दोन अशा पाच अपघातांची नोंद सोमवारी करण्यात आली.

अज्ञात वाहनाने रिक्षाला मारला कट

साक्री तालुक्यातील कोळपाडा येथील शंकरलाल सीताराम साबळे हे नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून मासे पकडून एमएच १८ डब्ल्यू ९६९० क्रमांकाची ॲपेरिक्षा चालवत दहिवेल गावाकडे येत होते. साक्री तालुक्यातील कोंडाईबारी घाटात त्यांच्या रिक्षाला अज्ञात वाहनाने कट मारल्याने त्यांची ॲपेरिक्षा उलटली. यात गंभीर दुखापत झाल्याने शंकर साबळे यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता घडली. साक्री पोलिसात सोमवारी नोंद झाली.

वाहनाच्या धडकेत महिला ठार

मालेगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या रोडवरील धुळ्यानजीक एका कंपनीच्या पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाची अनोळखी महिलेला धडक बसली. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घाेषित केले. धुळे तालुका पोलिसात सोमवारी गुन्हा नोंद झाला.

ट्रकच्या धडकेत एक जण ठार

धुळे तालुक्यातील कुळथे शिवारातून एमएच १९ झेड २५३२ क्रमांकाचा ट्रक जात असताना रस्त्याच्या बाजूला उभे असलेले राजेश वसंत देवरे (रा. धाडरी, ता. धुळे) यांना जोराचा धक्का लागताच ते रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ७ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी चालक रमेश देविदास भदाणे (वय ४६, रा. खलाणे, ता. शिंदखेडा) याच्या विरोधात सोमवारी गुन्हा नोंद झाला.

कारची दुचाकीला धडक

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर लळिंग घाटात एमएच ४१ एएस ०४७९ क्रमांकाची कार आणि एमएच १८ एस ८१२४ क्रमांकाची दुचाकी यांच्यात अपघात झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. यात नसरोद्दीन भिकन पिंजारी (रा. मालेगाव) यांना गंभीर दुखापत झाली. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना पिंजारी यांचा मृत्यू झाला. मोहाडी पोलिसात सोमवारी नोंद झाली.

ट्राॅलरने अनोळखीला उडविले

सोनगीरकडून शिरपूरकडे जाणाऱ्या रोडवर शिंदखेडा तालुक्यातील गोराणे फाट्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्राॅलरने अनोळखी इसमाला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. नरडाणा पोलिसात दुपारी नोंद करण्यात आली.

Web Title: Five people died in different incidents in the district dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.