भुसावळ विभागातील पाच तिकीट निरीक्षकांचा महाव्यवस्थापकांच्या हस्ते मुंबईत सत्कार
By सचिन देव | Published: May 9, 2023 07:06 PM2023-05-09T19:06:34+5:302023-05-09T19:06:54+5:30
रेल्वे प्रशासनाला विना तिकीट प्रवासी पकडून मिळवून दिला जास्तीत जास्त महसूल
सचिन देव, धुळे: विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून, रेल्वे प्रशासनाला जास्तीत जास्त महसुल मिळवून देणाऱ्या भुसावळ विभागातील पाच तिकीट निरीक्षकांचा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत सत्कार करण्यात आला. के. के. पाटील, गुडू कुमार, विनय ओझा, आर. के. गुप्ता व वंदना ढोमने असे या पाच तिकीट निरीक्षकांची नावे आहेत.
भुसावळ विभागाचे वाणिज्य विभागाचे सिनिअर डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे यांनी गेल्या वर्षभरात वेळोवेळी विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाई मोहिमा राबविल्या. यात वरिल पाचही तिकीट निरीक्षकांनी जास्तीत जास्त कारवाया केल्या. भुसावळ विभागातील या पाचही कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ठ काम केल्याबद्दल त्यांना मुंबई येथे बोलावून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भुसावळ विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक तरुण बिरिया यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाता ऑनलाईन पद्धतीने भुसावळचे डीआरएम एस. एस. केडिया व सिनिअर डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरेही उपस्थित होते.