खलाणे परिसरात मुसळधार, सूर नदीला पूर
By admin | Published: June 2, 2017 12:08 AM2017-06-02T00:08:20+5:302017-06-02T00:08:20+5:30
शेतकरी सुखावला : साक्री, शिंदखेडा तालुक्यात पहिल्या पावसाचे स्वागत
धुळे : जिल्ह्यात धुळे, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात गुरुवारी पावसाचे आगमन झाले. शिंदखेडा तालुक्यातील खलाणे परिसरात अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर नदीला पूर आला. पुरात मोटारसायकल आणि एका शेतक:याच्या शेतातील ठिबकचे साहित्य वाहून गेले.
शिंदखेडा तालुका - तालुक्यात खलाणे परिसरात निशाणे, महालपूर येथे सायंकाळी सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सूर नदीला पूर आला. याशिवाय तालुक्यात अलाणे येथे वादळी पाऊस झाला. तर वर्शी, शिंदखेडा येथेही पाऊस झाला.
साक्री तालुका - तालुक्यात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पिंपळनेर परिसरात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर कासारे, मालपूर आणि दहिवेल परिसरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तालुक्यात पश्चिम पट्टय़ात सर्वत्र पाऊस झाला. वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
धुळे तालुका - तालुक्यात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिरुड परिसरात तसेच खोरदड, मोरदड, मोरदड तांडा, चांदे शिवारात चांगला पाऊस झाला. याशिवाय कुसुंबा आणि नेर परिसरातही सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वादळी वा:यासह पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे व्यापा:यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
साक्री, शिंदखेडा तालुक्यात पहिला पाऊस
जिल्ह्यात धुळे तालुक्यात आधीही पाऊस झाला. परंतु अद्याप साक्री व शिंदखेडा तालुक्यात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सर्वाचे लक्ष पावसाकडे लागले होते. साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात दुपारी पावसाला सुरुवात झाली. पहिलाच पाऊस ब:यापैकी झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतक:यांची आता पीक लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे.