दिलेला शब्द पाळून धुळे शहराचे सर्व प्रश्न सोडवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:20 PM2018-12-10T14:20:00+5:302018-12-10T14:21:57+5:30
महापालिका निवडणुकीतील विजयानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला ५० जागांवर विजय मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाचे ५० किंवा त्यापेक्षा अधिक जागांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात धुळेकर जनतेचा विश्वास मोलाचा ठरला. एकहाती बहुमत दिले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आम्ही निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळून शहराचे सर्व प्रश्न सोडवू, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी येथे बोलताना दिली. जनतेने हा विजय बहाल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तो आम्ही सार्थ ठरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून धुळेकर अनेकांच्या दादागिरी, गुंडगिरीमुळे दबावात होते. तो त्यांनी यावेळी झुगारून दिला. येथील वाहतूक, हॉकर्स, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, भुयारी गटार असे अनेक प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही देत पक्षाला या निवडणुकीत बहुमत देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी येथील जाहीर सभेत केले होते. येथील जनतेने त्यावर विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून दिसत आहे. पक्षाचे येथील आमदार अनिल गोटे यांनी अनेक नाटके केली. पण त्यांना यश आले नाही. जनतेने त्यांना भुईसपाट केले. त्यांनी ते मान्य करावे. त्यांच्या पक्षाला एक जागा मिळाली, ती तरी कशी मिळाली याचे आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले.
पक्षाला ५० पेक्षा अधिक जागा निश्चितपणे मिळाल्या असत्या. परंतु माझे गणित थोडे चुकले. माझ्या मतदारसंघात शेंदुर्णी येथेही नगरपंचायतीची निवडणूक असल्याने तिकडे लक्ष द्यावे लागले. त्यामुळे येथे थोडे प्रयत्न कमी पडले. परंतु तरीही जनतेने भरभरून मतदान करून पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही धुळेकरांना दिलेला शब्द पाळणार असून शहरातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार अनिल गोटे यांच्याबद्दल ते म्हणाले की, त्यांनी आपली भाषा सुधारावी. आपण लोकप्रतिनिधी आहोत, याचे भान त्यांनी बाळगले पाहिजे. त्यांच्यासंदर्भात निर्णय घेण्याइतका मी मोठा नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.