गावाकडे जाणारी मजुरांची पाऊले थांबता थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:13 PM2020-05-09T22:13:11+5:302020-05-09T22:13:36+5:30
संडे अँकर । मिळेल त्या वाहनांचा आधार नाहीतर पायी जावून अंतर कमी करण्याचा प्रयत्न
धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी देशपातळीवर लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका हा मजुरांना बसला आहे़ गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून त्यांची आपल्या गावाकडे, घराकडे निघालेली पायी वारी शनिवारी देखील बऱ्यापैकी महामार्गावर दिसून आली़ यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातील मजुर कुटुंब असल्याचे समोर येत आहे़
पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहार राज्यातून मोठ्या मजूर वर्ग महाराष्ट्रात आलेला आहे़ त्यासाठी त्यांनी नाशिक, पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहराचा आधार घेऊन काम करत आपल्या आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवित होते़ अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आणि सर्वच व्यवहार ठप्प करीत देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली़ परिणामी त्याची अंमलबजावणी राज्यपातळीवरुन होण्यास सुरुवात झाल्याने मोठमोठे उद्योग धंदे, फॅक्टरी बंद होऊ लागल्या़ तेथे काम करणारी मजुरांची फळी देशोधडीलाच लागली़ काम बंद झाल्याने आता पुढे काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे सतावू लागला़ वाहन, एसटी, रेल्वे सर्वच बंद असल्याने पायी आपल्या गावाकडे निघायचे असा चंग त्यांनी बांधला असावा, परिणामी गेल्या १० ते १५ दिवसांपासून महामार्गावर मजूर आणि त्यांची पायीवारी दिसत आहे़
मुलांची होतेय आभाळ
मुंबई, पुणे येथून आपल्या गावाकडे निघालेल्या मजुर कुटुंबासोबत त्यांची लहान मुले देखील आहेत़ सध्या तळपळते ऊन लक्षात घेता त्यांची आभाळ होत असल्याचे दिसत आहे़ पण, त्यांचाही नाईलाज असल्याने मजुर त्यांना कधी खांद्यावर तर कधी महिला आपल्या कडेवर घेऊन अंतर कापत आहेत़ सायंकाळी उशिरा मात्र या चिमुकल्यांना काही अंतर पायी जावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे़
ठोस उपाययोजनेची आवश्यकता
स्थानिक आणि बाहेरील राज्यातील मजूर आपल्या गावाकडे पायी जात असताना ठोस उपाययोजना प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे़ ती प्रभावीपणे होत नसल्याने नाईलाजास्तव मजुर आणि त्यांच्या कुटुंबाला पायी जाण्याची वेळ आली आहे़