कष्टकयांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यम शिक्षणाचा पाया रोवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:33 AM2019-07-24T11:33:55+5:302019-07-24T11:41:13+5:30
रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मेडियम स्कूल : सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांवर भर
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील मिल परिसर म्हणजे कष्टकरी लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या नागरिकांच्या मुलांसाठी शांतीनिकेतन बहुउद्देशीय संस्थेने २००५ साली रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मेडियम स्कूलची स्थापना केली. त्या मुलांसाठी जणू इंग्रजी माध्यमाचा पाया या शाळेने रोवला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेतर्फे विविध उपक्रम राबविण्यावर नेहमीच भर दिला जातो.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या उपजत व अंगभूत गुणांना वाव मिळावा यासाठी ही संस्था नेहमी प्रयत्नशील असते. या विविध उपक्रमांमुळे त्याबाबतचा विश्वास दृढ होतो. आपल्या संस्कृतीशी मुलांची ओळख व्हावी यासाठी आषाढी एकादशीची पायी दिंडी, गोकुळाष्टमीची दहीहंडी, रक्षाबंधन, नवरात्र, दिवाळी सणावेळी किल्ले बनविणे, गणेशोत्स, होळी तसेच ख्रिसमस अर्थात सर्वांचा आवडता नाताळ यासारखे विविध सण शाळेतच साजरे करवून घेत त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली जाते.
रंगांची संकल्पना स्पष्ट व्हावी यासाठी विविध प्रकारचे कलर डे, रेड डे, ग्रीन डे, येलो डे साजरे करण्यात येतात. त्याचप्रमाणे भाजी, फळांची माहिती व्हावी यासाठी शाळेत भाज्या व फळे आठवडा साजरा होतो. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी बाजारपेठ, गिरणी तसेच विविध स्थळांना विद्यार्थ्यांना नेऊन भेटी दिल्या जातात. निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ व्हावे म्हणून शाळेत वृक्षारोपण,मातीचे किल्ले बनविणे असे उपक्रम राबविले जातात. आत्मविश्वास, सभाधीटपणा हे गुण विद्यार्थ्यांत विकसित व्हावेत यासाठी दरवर्षी शाळेचे वार्षिक स्रेहसंमेलन मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. विद्यार्थी व पालक सहभागी होतात. व्यक्तिमत्व विकास शिबिरातून हॉर्स रायडींग, रायफल शूटींग, डान्स, कराटे, योगा आदी उपक्रम घेतले जातात.