मारहाणीत तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक; साक्री तालुक्यातील चिंचपाडा येथील घटना

By देवेंद्र पाठक | Published: March 21, 2023 05:09 PM2023-03-21T17:09:35+5:302023-03-21T17:09:49+5:30

किरकोळ वादाचे पडसाद

Four arrested including wife in connection with death of young man in beating; Incident at Chinchpada in Sakri Taluka | मारहाणीत तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक; साक्री तालुक्यातील चिंचपाडा येथील घटना

मारहाणीत तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक; साक्री तालुक्यातील चिंचपाडा येथील घटना

googlenewsNext

धुळे : किरकोळ कारणावरून वाद घालत असल्याच्या कारणावरून पत्नीसह सासरकडील मंडळींनी गळा दाबून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात अजय भालचंद्र बर्डे (वय ३९) यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात चार जणांविरोधात खुनाचा दाखल झाला. गुन्हा दाखल हाेताच मयत अजय याच्या पत्नीसह सासू, सासरा आणि शालक या चौघांना अटक करण्यात आली.

अजय भाल्या ऊर्फ भालचंद्र बर्डे त्यांची पत्नी सुंदरबाई अजय बर्डे (वय ३५) व तीन मुले हे आजोबांसोबत नवापूर रोड, कुडाशी गावाजवळ काकसेवडपैकी चिंचपाडा, ता. साक्री येथे एकत्र राहात होते. अजय व त्याची पत्नी सुंदरबाई यांच्यात नेहमी किरकोळ वाद हाेते. त्यातून भांडण होत असे. रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अजय व त्याची पत्नी राहत्या घराच्या ओट्यावर बसले होते. त्यावेळी त्याच्यात वाद झाला. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अजयची सासू शानूबाई शांताराम मालचे (४३), सासरा शांताराम हाट्या मालचे (४७), त्याचा शालक डॅनियल शांताराम मालचे (वय २४) हे आले. त्यांनी अजय याला मारहाण केली. लाथाबुक्क्याने पोटावर मारहाण करत गळाही दाबल्याने गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर त्याला पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी लक्ष्मण कुची बर्डे (वय ७०, रा. काकसेवड, ता. साक्री) यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भादंवि कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्हा दाखल होताच शांताराम हाट्या मालचे (४७), शानूबाई शांताराम मालचे (४३), डॅनियल शांताराम मालचे (वय २४, रा. मांजरी, ता. साक्री) आणि मयत अजयची पत्नी सुंदरबाई अजय बर्डे (वय ३५, रा. काकसेवड, ता. साक्री) या चार जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे करीत आहेत.

Web Title: Four arrested including wife in connection with death of young man in beating; Incident at Chinchpada in Sakri Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.