लूट प्रकरणी चौघांना अटक, सुनावली पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 09:26 PM2020-08-16T21:26:47+5:302020-08-16T21:27:10+5:30
दोन वेगवेगळ्या घटना : घातक सशस्त्रही केली जप्त
धुळे : येथील सुरत बायपासजवळ चाकू हल्ला करून सुरक्षा रक्षकाला लुटण्याचा अयशस्वी झाला. तर मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक चालकाला लुटल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या दोन्ही वेगवेगळ्या घटनेतील चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपींकडून घातक शस्त्रे जप्त केली आहे. दरम्यान चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मील परिसरातील सिताराम माळी चाळीत राहणारे व एमआयडीसीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असलेले दिगंबर देविदास पाटील (४६) ह शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कामांवरुन घरी परतत होते़ त्यांना सुरत बायपासवर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी अडविले़ त्यांच्याकडे रोख रकमेसह दागिने आणि मोबाईलची मागणी केली़ मात्र पाटील यांच्याकडून काहीच न मिळाल्याने या दोघा लुटारुंनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करीत तेथून ते पसार झाले़ या घटनेची माहिती दिगंबर पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याला कळविली़ त्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी नियंत्रण कक्षासह सर्वच पोलीस ठाण्यांना घटनेची माहिती कळविली़ त्याचवेळेस आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल नालंदाजवळ एका ट्रक चालकालाही लुटल्याची माहिती आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना कळाली़
मालेगाव येथील राजेंद्र चैत्राम पगार (५५) हे एमएच ४१ एयू २५०७ या क्रमांकाच्या ट्रकमधून भाजीपाला घेऊन धुळे मार्गे एरंडोलकडे जात असताना हॉटेल नालंदाजवळ त्यांची गाडी पंक्चर झाली़ टायर बदलत असताना मोटारसायकलीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण केली़ शिवाय त्यांच्याजवळील ७ हजार ११० रुपयांची रोकड, मोबाईल, टोलनाका कार्ड तसेच वाहनांचा परवाना हिसकावून घेत पोबारा केला़ याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़
काही वेळापुर्वी सुरतबायपासवर घडलेल्या घटनेशी या घटनेशी साम्यता असल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी दोन समातंर पथके तयार करून शोध कामी त्यांना रवाना केले़ यानंतर पारोळा चौफुलीवरुन मोटारसायकलीवरुन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी संशयावरुन अडविले़ त्यांची चौकशी आणि अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन चाकू, लोखंडी टॅमी सापडल्याने हेच ते लुटारु असल्याची खात्री पोलिसांना पटली़ करन उर्फ न्हानू सुनील मोरे (२०, रा़ आरती कॉलनी, देवपूर) आणि राकेश उर्फ बाळा शालिग्राम आखडमल (२०, रा़ वारुळ पाष्टे, ता़ शिंदखेडा) या दोघांना अटक करण्यात आली़ शिवाय त्यांच्याजवळ लुटीची २८ हजार ९१० रुपयांसह वाहन परवाना, मोबाईल, डेबिट कार्ड, टोलनाका कार्ड आढळून आली आहेत़ ती सर्व जप्त करण्यात आली़
तर, दुसºया शोध पथकाला वरखेडी रोडवरुन जाणाºया दोघांचा संशय आल्याने त्यांना पोलिसांनी थांबविले़ त्यांची चौकशी आणि अंगझडती घेण्यात आली़ याप्रकरणी किरण उर्फ ऋषभ मनोहर शिरसाठ (२०, रा़ प्रियदर्शनी नगर, नगावबारी, देवपूर धुळे) आणि तुषार यशवंत बाविस्कर (१८, रा़ पांडव नगर, नांदेडकर गॅरेजच्या मागे, धुळे) यांना अटक करण्यात आली़ त्यांच्या दुचाकीला तलवारीसह चाकू असे हत्यार सापडले़ त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली़ एक लोखंडी फरशी कुºहाड, दोन लोखंडाच्या कुºहाडी, तीन भाले, एक तलवार, बेसबॉलचा दांडा अशी घातक शस्त्र सापडली़ पोलिसांनी ती जप्त केली आहे़
या दोन वेगवेगळ्या घटनेतील चौघांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास आझादनगर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत़