धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत सरपंच, उपसरपंचासह चार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 12:27 PM2019-01-27T12:27:56+5:302019-01-27T12:29:50+5:30
संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको : साक्री तालुक्यातील घटना
लोकमत आॅनलाईन
साक्री : तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण चार जण ठार झाले. त्यात तालुक्यातील दातर्ती ग्रा.पं.च्या सरपंच, उपसरपंचांचा समावेश आहे. दरम्यान या अपघातास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रविवारी सकाळपासून येथील राष्टÑीय महामार्गावर रास्तारोको सुरू केले असून वाहतूक ठप्प झाली आहे. दुस-या अपघातातील मृतांची ओळख पटलेली नाही.
तालुक्यातील दातर्ती गावाचे सरपंच सदाशिव बागुल (३०) व उपसरपंच गणेश सूर्यवंशी हे दोघे दुचाकीने जात असताना त्यांना वाळू माफियांच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेवाळी -दातर्ती दरम्यान घडली. यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
आरोपींवर कारवाईसाठी रास्तारोको
दरम्यान हे वृत्त तालुक्यात पोहचताच संतप्त पदाधिकारी व ग्रामस्थांनी या अपघातास जबाबदार असलेल्या आरोपींवर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी शहरात राष्टÑीय महामार्गावर रविवारी सकाळी ९ वाजेपासून रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. त्यात तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचा सहभाग आहे.
रास्तारोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या दोन्ही बाजूला आठ-नऊ किमीपर्यंत रांगा लागल्या आहेत. पोलिसांचा फौजफाटाही आंदोलन स्थळी आहे. मात्र ग्रामस्थांनी रास्तारोको सुरूच ठेवला आहे.
दुस-या अपघातातही दोन ठार
तालुक्यातील महामार्गावरील देवनगर गावाजवळ ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून शनिवारी मध्यरात्री झालेल्या दुस-या एका अपघातात दोन जण ठार झाले असून ते अनोळखी आहेत. त्यामुळे पोलिसांकडून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान एकाच रात्री दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.