आणखी चार जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 06:38 PM2020-05-20T18:38:28+5:302020-05-20T18:39:42+5:30
आतापर्यंत ४१ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त
धुळे : येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून आज आणखी ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. त्यात एका डॉक्टरचा समावेश आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत ४५ (धुळे जिल्ह्याबाहेरील सहा जण वगळता) जणांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे डेडिकेटड कोविड हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत ८० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४१ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. त्यानंतर आज या ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, डॉ. रामानंद, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते.