तरुणाच्या चौकशीतून चार मोटारसायकलीचा शोध; शहर पोलिसांची कारवाई
By देवेंद्र पाठक | Published: November 4, 2023 05:25 PM2023-11-04T17:25:17+5:302023-11-04T17:25:39+5:30
ताब्यातील तरुणाची चौकशी
देवेंद्र पाठक, धुळे: चोरीला गेलेल्या मोटारसायकलीची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होताच शहर पोलिसांच्या शोध पथकाने तपासाची चक्रे फिरविली आणि एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरलेल्या चार मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या. दरम्यान, त्याच्या विरोधात पोलिसात नोंद घेण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. आणखी मोटारसायकली त्याच्याकडून मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धुळ्यातील संगमा चौक, कृषी नगरात राहणारे दिलीप गिरधर लोथे यांची एमएच १८ एजी ६५२१ क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. त्यांनी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली. शहर पोलिसांच्या शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, कर्मचारी विजय शिरसाठ, दिनेश परदेशी, कुंदन पटाईत, रवींद्र गिरासे, महेश मोरे, मनीष सोनगीरे, प्रवीण पाटील, वसंत कोकणी, तुषार पारधी, अमित रनमळे, अमोल पगारे यांनी आपली कसब पणाला लावली.
सुरत बायपासवर राहणाऱ्या एका तरुणाने ही दुचाकी मालेगाव येथे विक्री करण्यासाठी घेऊन गेलेले होते. परंतु त्याच्याकडे गाडीचे कागदपत्र नसल्याने त्याला गाडी विकता आली नाही. त्याने चोरीची गाडी सुरत बायपास येथील हॉटेल चंद्रदीपच्या मागे मोकळ्या जागेत दुचाकी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच तरुणाला जेरबंद करुन त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांना संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरलेली दुचाकी काढून दिली शिवाय अन्य ४ दुचाकी देखील काढून दिल्या. त्याची किंमत १ लाख १ हजार इतकी आहे.