चार शिक्षकांकडे पाच वर्गांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:43 PM2019-07-20T22:43:49+5:302019-07-20T22:44:26+5:30
शासकीय विद्यानिकेतन । शाळेत अनेक वर्षांपासून क्रीडा, चित्रकला शिक्षकच नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील विभागीय शासकीय विद्या निकेतन शाळेत सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहे. या शाळेत १२ शिक्षकांची गरज असतांना केवळ चारच शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून शाळेत क्रीडा तर ९ वर्षांपासून चित्रकला शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही.
नाशिक विभागाची विद्या निकेतन शाळा ११ जुलै १९७९ मध्ये धुळ्यात स्थलांतरीत झाली. जवळपास सहा एकर एवढ्या प्रशस्त जागेत ही शाळा असून, पूर्वी ‘दगडी शाळा’ म्हणून ही शाळा परिचित होती. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यानिकेतनमध्ये प्रवेश दिला जातो.
धुळ्यात इयत्ता सहावी ते दहावी असे सहा वर्ग आहेत. प्रत्येक वर्गाची विद्यार्थी क्षमता ४० आहे. मात्र गेल्या काही वर्षात या शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावली आहे. सद्यस्थितीत एका वर्गात २०-२२ विद्यार्थीच आहेत. एकूण २४० पैकी जवळपास ८० विद्यार्थीच आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगणा या भागातील आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. सहावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, त्यानंतर अजून विद्यार्थी संख्या वाढू शकते असे शाळेतर्फे सांगण्यात आले.
शासकीय शाळा असतांना शासनाचे या शाळेकडे दुर्लक्ष झालेले आहे. या शाळेत प्रत्येक वर्गाची एक-एक तुकडी आहे. या शाळेत १२ शिक्षकांचे पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात मात्र चारच शिक्षक कार्यरत आहेत. चार शिक्षकांना पाच वर्गाचा भार सांभाळावा लागतो. शिक्षकांची भरती करावी अशी अनेक वर्षांची मागणी असून, त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसून आले आहे.
* क्रीडा, चित्रकला विषयाला शिक्षकच नाही*
विशेष म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून या शाळेत क्रीडा शिक्षकच नाहीत. असे असतांनाही या शाळेच्या विद्यार्थ्यांनी २०१४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत विद्यानिकेतचा पूर्ण संघ सहभागी झाला होता. त्यातून एका विद्यार्थ्याची राष्टÑीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. क्रीडा शिक्षक नसतांना विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचे त्यावेळी अनेकांनी कौतुक केले होते.
क्रीडा शिक्षकाप्रमाणेच २०१० मध्ये येथील चित्रकला शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याजागी दुसºया कला शिक्षकाची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. हिंदीचीही हिच स्थिती आहे. केवळ शिक्षकच नाही तर प्राचार्यांचे पदही रिक्त असून, सध्या प्रभारी प्राचार्यांची नियुक्ती केली आहे. त्याचसोबत कार्यालयीन कर्मचाºयांचीही संख्या कमी आहे. कमी मनुष्यबळावरच शाळेचे सर्व कामकाज सांभाळावे लागते. या शाळेत पुरेशा प्रमाणात शिक्षक, व कार्यालयीन कर्मचाºयांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. विभागस्तरावर असलेल्या एकमेव विद्यानिकेतन शाळेकडे लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज आहे.
विद्या निकेतनमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर पोहचले आहे, ही शाळेसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, डॉ. उल्हास पाटील यांच्यासारख्या अनेकांनी या शाळेतून शिक्षण घेतले आहे. दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून विद्यानिकेतनची ख्याती राहिलेली आहे. मात्र आता विद्यार्थी संख्या प्रचंड रोडावलेली आहे.