बाजरी संशोधन केंद्राने केले चौथे वाण विकसीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:52 AM2019-07-11T11:52:07+5:302019-07-11T11:52:59+5:30
देशातील नऊ राज्यांना लाभ : धुळ्याच्या बाजरा संशोधन केंद्राचे नाव देशपातळीवर
अतुल जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आहारात लोह आणि जस्ताचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. लोहाचे प्रमाण कमी असल्यास मानवाच्या शारिरिक वाढ व मानसिक क्षमतेवर परिराम होतो. तर जस्ताच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. यावर उपाय म्हणून कृषी महाविद्यालय धुळे येथील बाजरी संशोधन योजना यांनी एम.एच २११४ (डी.एच.बी.एच.१३९७) हे बाजरीचे नवीन वाण विकसीत केले असल्याची माहिती माहिती बाजरी संशोधन योजनेतील रोप पैदास शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. तथा संशोधक डॉ. एच.टी.पाटील यांनी दिली.
मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या जीवनसत्वासोबतच खनीज पदार्थांचीही आवश्यकता असते. खनीज पदार्थांमध्ये लोह व जस्ताचे प्रमाण हे सुध्दा महत्वाचे आहेत.
भारतात ८० टक्के गर्भवती स्त्रिया, ५२ टक्के इतर स्त्रिया व ७४ टक्के ६ ते १५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये लोहाचा तर ५२ टक्के लहान मुलांमध्ये जस्ताची कमतरता आढळून आलेली आहे.
बाजरी हे आहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे तृणधान्य आहे. बाजरीत लोह व जस्त अधिक प्रमाणात असते. हाच उद्देश लक्षात घेऊन, आंतरराष्टÑीय पीक संशोधन संस्था हैद्राबाद (इक्रिसॅट) व महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, धुळे येथील बाजरी संशोधन योजना यांनी संयुक्त विद्यमाने ‘धनशक्ती आणि महाशक्ती’ हे दोन तर बाजरी संशोधन योजना धुळे यांनी ‘आदिशक्ती’ हे वाण यापूर्वी विकसीत केलेले आहे.
*नवीन वाण विकसीत*
आता धुळ्याच्या बाजरी संशोधन योजना यांनी सन २०१८ मध्ये एम.एच.२११४ (डी. एच. बी. एच. १३९७) हे संकरित वाण विकसीत केले आहे. महाराष्टÑवगळता राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणासह देशातील नऊ राज्यांसाठी हे संकरित वाण विकसीत केले आहे. ज्या अवर्षणप्रवण क्षेत्रात ४०० मिलिमिटरपेक्षा कमी पाऊस पडतो, त्याक्षेत्रासाठी हे वाण अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
या वाणाचा लागवडीचा कालावधी १५ जून ते १५ जुलै असा आहे. प्रति एकरासाठी दीड किलो बियाणे लागत असून, पिकाचा कालावधी ७८ ते ८० दिवसांचा आहे. एका हेक्टरमध्ये ३४ ते ३५ क्विंटल उत्पन्न देणारे हे वाण आहे. या वाणाचे वैशिट्य म्हणजे लांब कणिस असून, ठोकळ व राखी रंगाचा दाणा आहे. हे वाण ‘गोसावी’ रोगास प्रतिबंध करीत असते. बाजरीचे हे संकरित वाण विकसीत करण्यासाठी डॉ. व्ही.वाय. पवार, डॉ. आर.के. गवळे, डॉ. सी.एच. ठाकरे, डॉ.एन.एस. उगले, एम.जे. गावीत, यांचेही सहकार्य लाभले आहे.
बाजरीचे नवीन संकरित वाण महाराष्टÑ व्यतिरिक्त इतर राज्यांसाठी विकसीत केले आहे. यामुळे धुळ्याच्या बाजरा संशोधन केंद्राचे नाव देशपातळीवर उंचावले आहे.
डॉ.एच.टी. पाटील
बाजरी पैदासकार,बाजरी संशोधन योजना, कृषी महाविद्यालय,धुळे.