कर्जाचे आमिष दाखवून केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 10:39 PM2019-10-13T22:39:43+5:302019-10-13T22:40:05+5:30
१ लाख ६४ हजारांचा फटका : दिल्लीच्या सहा जणांनी धुळ्यात एकाला गंडविले, गुन्हा नोंद
धुळे : आॅनलाईन पध्दतीने बँकेत पैसे भरुन १ ते ५० लाखांपर्यंत कर्ज देण्याचे आमिष दाखवून दिल्ली येथील सहा जणांनी धुळ्यातील तरुणाला १ लाख ६४ हजार ४०० रुपयांत गंडविल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़
देवपुरातील प्रोफेसर कॉलनीत राहणारा मनोज तुकाराम पाटील याने आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, शहरातील गल्ली नंबर ५ मधील महापालिका शाळा क्रमांक ९ जवळ नाकोडा कॉम्प्लेक्स आहे़ या ठिकाणी मनोज पाटील यांचे कार्यालय आहे़ दिल्ली येथील अमन गुप्ता याने फोन करुन न्यू दिल्ली येथून आपल्याला एक लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल, असे आमिष दाखविले़ त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड असे काही महत्वाची कागदपत्रे मागवून घेतली़ त्यानंतर मनोज पाटील यांचा विश्वास संपादन करुन घेत कट कारस्थान रचून आॅनलाईन पैसे बँकेत टाकण्यास भाग पाडले़ परिणामी १ लाख ६४ हजार ६०० रुपये टाकून देखील उपयोग झाला नाही़ हा प्रकार ४ ते ७ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत घडला़
आपण लुटले गेल्याची कल्पना आल्यानंतर मनोज पाटील यांनी आझादनगर पोलीस ठाणे गाठले आणि शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास फिर्याद दिली़ त्यानुसार दिल्ली येथील रहिवासी अमन गुप्ता, टिंकू कुमार, प्रमोद, लाडली बानो, दिपीका शर्मा, सुरेश मेहता (कोणाचेही पूर्ण नाव माहिती नाही) या संशयितांविरुध्द भादंवि कलम ४०६, ४२०, १२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ पुढील तपास सुरु आहे़
दरम्यान, फसवणूक करणारे नेमके कोण? याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे़