सीटी स्कॅन मशीन खरेदीत डॉक्टरांची फसवणूक; मुंबई व पुण्यातील दोघांवर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Published: November 8, 2023 05:47 PM2023-11-08T17:47:08+5:302023-11-08T17:47:15+5:30
याप्रकरणी डॉक्टरने देवपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे : सीटी स्कॅन मशीन घेण्याचे आमिष दाखवून धुळ्यातील एका डॉक्टरची दोघांनी सुमारे पाच लाख १० हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार ६ मे ते २० सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला. याप्रकरणी डॉक्टरने देवपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवपुरातील देवरे ॲक्सिडेंट हॉस्पिटल ॲण्ड प्रथमेश क्रिटिकल सेंटरचे डॉ. पंकज श्यामराव देवरे (४५, रा. दत्तमंदिर, देवपूर, धुळे) यांनी देवपूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार मुंबई व पुणे येथील दोघा संशयितांनी त्यांना सीटी स्कॅन मशीन घेण्याचे आमिष दाखवून त्यांच्या खात्यात ३५ लाख रुपये टाकण्यास सांगितले. पैसे भरूनदेखील सीटी स्कॅन मशीन न आल्याने त्यानी संशयित आरोपींकडे पैशांची मागणी केली.
तेव्हा संशयितांनी त्यांना २९ लाख ९० हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित ५ लाख १० हजार रुपये परत केले नाहीत. फिर्यादीने पैशांसाठी तगादा लावला असता, त्यांना वेळोवेळी खोटे धनादेश, डीडीने पाठविलेले खोटे मॅसेज व्हाॅट्सॲपवर पाठवून फिर्यादीचा विश्वासघात केला. याप्रकरणी देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक एच. सी. पाटील करीत आहेत.