धुळे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत ५६५ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 04:24 PM2018-03-14T16:24:35+5:302018-03-14T16:24:35+5:30
अजुन दोन सोडत काढणार, ९३ शांळांमध्ये देणार प्रवेश
आॅनलाईन लोकमत
धुळे : आर.टी.ई.अंतर्गत वंचीत व दुर्बल घटकांतील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशे देण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०१८-१९ या वर्षासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची पहिली सोडत नुकतीच काढण्यात आली. त्यात पहिल्या फेरीत ५६५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी दिली.
आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता १० फेब्रुवारीपासून आॅनलाईन नोंदणी सुरू झालेली होती. या प्रवेश प्रक्रियेची शेवटची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत होती. मात्र विद्यार्थ्यांचे हित व पालकांच्या विनंतीवरून प्रवेश प्रक्रियेची मुदत ७ मार्च २०१८ पर्यंत वाढविण्यात आली होती. ७ मार्च अखेरपर्यंत ९३ शाळांमधील १,१८१ जागांसाठी एकूण १ हजार ४६५ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले.
प्राप्त झालेल्या अर्जांमधून पहिली आॅनलाईन सोडत सोमवारी सिस्टेल इंग्लिश मेडीयम स्कूल, देवपूर,धुळे येथे काढण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी मोहन देसले, प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी, मनीषा वानखेडे उपस्थित होत्या.
यावेळी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. पहिल्या सोडतीत ६५६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या संदर्भात त्यांच्या पालकांना मोबाईल मेसेज पाठविणे सुरू झाले आहेत. या विद्यार्थ्यांना २८ मार्च पर्यंत शाळेत जावून प्रवेश घ्यावयाचा आहे.
दाखल अर्जांपैकी सर्वात जास्त अर्ज नॉर्थ पॉइंट या शाळेसाठी दाखल झालेले आहे.