३२० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 10:51 PM2020-01-08T22:51:30+5:302020-01-08T22:51:46+5:30
कासारे : ५० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, औषधांचेही वितरण
कासारे : साक्री तालुक्यातील कासारे येथे ५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३२० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच ५० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. याच कार्यक्रमात व्यसनमुक्तीबाबतही जनजागृती करण्यात आली.
पारख परिवार, साक्री तालुका प्रवासी महासंघ, महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा व मातोश्री चंदनबाई पारख महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने नववर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरात डॉ.गुणवंत कोळी यांनी ३२० रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली. गरजूंना मोफत औषधे देण्यात आली. ५० रुग्णांची कांतालक्ष्मी शहा नेत्रालय, नंदुरबार येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. मोतीबिंदूच्या रुग्णांना जाण्या-येण्याची सुविधा, चहा- नाश्ता, जेवण, औषधे, काळा चष्मा, लेन्स टाकून शस्त्रक्रिया, त्यानंतर ७ दिवसांनी व ३० दिवसांनी तपासणी या सर्व सुविधा मोफत करण्यात आल्या आहेत.
अध्यक्षस्थानी लिलाबाई राजमल पारख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शामकांत दाभाडे, निलेश भामरे, विनोद भामरे, लोटन भामरे, अंध शाळेचे शिक्षक सुरेश बच्छाव, प्रकाश वाघ, संजय सूर्यवंशी, जितेंद्र जगदाळे, संग्रपाल मोरे, प्रवासी महासंघ व अंनिसचे शाखाध्यक्ष सुरेश पारख, सचिव सुहास सोनवणे, मातोश्री चंदनबाई पारख महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगला पारख, आर्या पारख, मोहन देसले उपस्थित होते.
दरम्यान, सुरेश पारख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत जळगाव येथील स्वर्णकाळ फाउंडेशन व संत नरहरी फाउंडेशनच्यावतीने त्यांची नाना शंकरशेठ राष्ट्रीय स्मृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी स्वर्णकाळ फाउंडेशनचे अध्यक्ष शामकांत दाभाडे,निवड समिती अध्यक्ष निलेश भामरे, विनोद भामरे, लोटन भामरे यांच्याहस्ते सुरेश पारख यांना पुरस्कार निवडीचे पत्र देण्यात आले.