जिल्ह्यात मोफत तांदूळ वाटपाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:04 PM2020-04-16T21:04:24+5:302020-04-16T21:05:27+5:30

सात हजार ४०९ मेट्रीक टन तांदूळ : शिरपूर तालुक्यासाठी ११७५ मेट्रीक तांदूळ मंजूर, आतापर्यंत २५ टक्के वाटप

Free rice distribution in district | जिल्ह्यात मोफत तांदूळ वाटपाला सुरूवात

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/शिरपूर : शहरी भागानंतर आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोफत तांदूळ वाटपाला सुरूवात झाली आहे़ पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना तांदूळाचे वितरण सुरळीत सुरू आहे़ मोफत तांदूळ हो केवळ अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंबातील नियमतीत लाभार्थ्यांसाठी आहे़ केशरी कार्डधारकांसाठी मे आणि जून महिन्यात स्वस्त धान्याचा वेगळा कोटा प्राप्त होणार आहे़
धुळे जिल्ह्यासाठी एप्रिल महिन्याचा मोफत तांदूळाचा सात हजार ४०९ मेट्रीक टन इतका कोटा मंजूर झाला आहे़ मे आणि जून महिन्यातही तेवढाच कोटा प्राप्त होईल़ सुरूवातीला शहरी भागात वाटप सुरू केले़ त्यानंतर आता ग्रामीण भागातही सर्वत्र वाटप सुरू आहे़ आतापर्यंत मोफत तांदळाचे २५ टक्के वाटप झाले असून आठ दिवसात एप्रिल महिन्याचा तांदूळ वाटप करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली़
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो तांदुळ मोफत देण्याची योजना आहे़ अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंबातील पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किला अतिरिक्त तांदुळ मोफत देण्यात येणार आहे़ तांदूळ वाटपाला सुरूवात झाली आहे़
शिरपूर तालुक्यात प्राधान्य कुटुंब संख्या २ लाख ३५ हजार ३६ इतकी असून त्यासाठी प्रत्येकी सदस्यांना ५ किलो तांदुळ प्रमाणे ११७५ मेट्रीक टन तांदुळ मंजूर करण्यात आला आहे़ अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या नियमित ३५ किलो अन्न धान्याचे वितरण केल्यानंतर सदर अंत्योदय अन्न योजना शिधा पत्रिकेतील सदस्य संख्येनुसार प्रति सदस्य ५ किलो तांदुळाचे मोफत वितरण करावयाचे आहे़ म्हणजेच अंत्योदय अन्न योजना शिधा पत्रिकेवर एक सदस्य असल्यास ५ किलो, दोन सदस्य असल्यास १० किलो या प्रमाणे तांदुळाचे मोफत वितरण करावयाचे आहे़
तालुक्यात जीवनाश्यक वस्तुंची व औषधांची कोणतीही टंचाई नाही़ किराणा दुकानांमधून वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा, याकरीता प्रशासन खबरदारी घेत आहे़ मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळा बाजार व अतिरिक्त भाववाढीच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे़ जीवनाश्यक वस्तुंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास ७ वर्षापर्यंत कैद होवू शकते़ याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग, पोलिस प्रशासन यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़
शिरपूर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरूळीत सुरू आहे़ १४ हजार ३२६ अंत्योदय कार्ड धारकांना ३०९ मेट्रीक टन मंजूर तांदूळ मंजूर झाला असून त्याचे वाटप सुरू आहे़ दरम्यान, १ हजार १७५ मेट्रीक टन तांदुळ मंजूर करण्यात आला असून अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना त्याचे वितरण सुरू आहे़
तालुक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय कार्ड युनिट ७५ हजार १९१ तर प्राधान्य कुटुंब संख्या २ लाख ३५ हजार ३६ अशी एकूण दोन्ही प्रकारच्या २ लाख ४९ हजार ३६२ युनिटसंख्या पात्र आहे़ या लाभार्थ्यांना २०५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो़
अंत्योदयाचे १४ हजार ३२६ कार्डधारक असून प्रति कार्डधारकाला गहू २६ तर तांदुळ ९ किलो दिले जात असून ७५ हजार १९१ युनिट धारकांनी आॅनलाईन आधार लिंक केली आहे़ मात्र प्रत्यक्षात ६१ हजार ५९७ अंत्योदय युनिटचे तांदुळ केवळ ३०९ मेट्रीक टन मंजूर झाले़ त्यामुळे उर्वरीत १३ हजार २३४ अंत्योदय युनिटचे वाढील ६७ मेट्रकी टन नियतन मंजूर करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे़ सदर वाढीव नियतन मंजूर झाल्यावर तात्काळ शासकीय गोदामात मोफत धान्याचे परमिट पाठविण्यात येतील़ त्यानुसार गोदामातून रास्तभाव दुकानात ते धान्य पोहचल्यावर एप्रिल या महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत तांदुळ केवळ अन्नसुरक्षा योजना अंतर्गत असलेल्या अंत्योदय व प्राधान्य लाभार्थी यांना वाटप केले जाणार आहे़ त्यापैकी फक्त ६१ हजार लाभार्थ्यांना पुरेल एवढेच अन्नधान्य मंजूर केले आहे़ संबंधित लाभार्थ्यांना कमी धान्याचा पुरवठा केला तर तक्रारी वाढतील असे वरिष्ठांना कळविण्यात आले आहे़
रेशन दुकानांवर गर्दी होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना याआधीच प्रशासनाने केल्या आहेत़ परंतु केशरी रेशनकार्ड धारक गर्दी करीत असल्याने नियोजन कोलमडते़ सध्या मोफत तांदूळ पात्र लाभार्थ्यांना दिला जात आहे़ त्यामुळे केशरी कार्डधारकांनी गर्दी करु नये असे आवाहन केले आहे़
केशरी कार्डधारकांनी गर्दी करु नये़़़
४जिल्ह्यातील सर्व पात्र केशरी कार्डधारक लाभार्थ्यांना माहे मे व जून महिन्यात प्रती वक्ती ३ किलो गहू ८ रुपये प्रती किलो व दोन किलो तांदूळ १२ रुपये प्रती किलो या सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानात वितरणासाठी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे या लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे. सध्या नियमीत अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वितरण सुरू आहे़ केशरी रेशनकार्ड धारकांसाठी मे आणि जून महिन्यात धान्यकोटा उपलब्ध होणार आहे़

Web Title: Free rice distribution in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे