भरधाव एसटीने १३ मेंढ्या चिरडल्या, चालकावर गुन्हा; साक्री तालुक्यातील कळंबीर येथील घटना
By देवेंद्र पाठक | Published: November 13, 2023 03:45 PM2023-11-13T15:45:12+5:302023-11-13T15:45:30+5:30
साक्री पोलिस ठाण्यात सायंकाळी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.
धुळे : नंदुरबारकडून साक्रीच्या दिशेने येणाऱ्या महामंडळाच्या बसने भरधाव वेगाने येत मेंढ्यांना जोरदार धडक दिली. यात जागीच १३ मेंढ्या ठार तर ७ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना साक्री तालुक्यातील कळंबीर शिवारात रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात सायंकाळी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.
मेंढपाळ महेंद्र चिंधा थोरात (वय २०, रा. कळंबीर, ता. साक्री) याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, एमएच ४० वाय ५६५४ क्रमांकाची बस नंदुरबारकडून साक्रीच्या दिशेने येत असताना कळंबीर शिवारात सुरेश रूपचंद साळुंखे यांच्या शेतासमाेर मेंढ्यांना भरधाव बसची धडक बसली. बसची जोरदार धडक बसल्याने मेंढ्या चिरडल्या गेल्या. त्यात जागीच १३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या, तर ७ मेंढ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. या घटनेनंतर बस अडविण्यात आली. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. तातडीने जखमी आणि मृत झालेल्या मेंढ्यांना योग्य जागी स्थलांतरित करण्यात आले.
याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात महेंद्र थोरात याने रविवारी दुपारी दाखल केलेल्या फिर्यादीवरून बस चालक योगेश प्रकाश चिमणकर (वय ३८, रा. पिंपळगाव बसवंत) यांच्या विरोधात भादंवि कलम २७९, ४२९ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल डी. आर. कांबळे करीत आहेत.