निधी मंजूर, पण कामे कोण करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 09:36 PM2017-09-17T21:36:23+5:302017-09-17T21:37:03+5:30
भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ३८ कोटींना मंजूरी : आमदार-मनपामध्ये होणार संघर्ष?
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील धोकादायक वीज वाहिन्या भुमिगत करण्यासह अनुषंगिक कामांसाठी ३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळयात केली़ मात्र आमदार व महापालिकेत त्यावरून पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याने निधी मंजूर होऊनही कामे करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे़
शहरात एका वीज उपकेंद्रासाठी मनपाने जागा दिली असून या जागेची किंमत ६६ लाख ६६ हजार इतकी आहे़ ऊर्जामंत्र्यांनी गेल्यावर्षी दिलेल्या आदेशानुसार तितक्या किंमतीचे कामे महावितरण मनपाला करून देणार होते़ त्यामुळे महावितरणने कामे सुचविण्याची मागणी मनपाकडे केली़ त्यानुसार महापालिकेने सुकवद व बाभळे येथील वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविणे आणि शहरातील आग्रा रोडवरील वीजतारा भुमिगत करण्याचा प्रस्ताव दिला होता़ त्याबाबत मनपा व महावितरणमध्ये पत्रव्यवहारही गेल्या वर्षापासून सुरू आहे़ त्यानुसार महापौर कल्पना महाले यांनी ऊर्जामंत्र्यांनी नुकत्याच घेतलेल्या जनता दरबाराच्या कार्यक्रमातही आग्रारोडवरील भुमिगत तारांचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली़ दुसरीकडे आमदार अनिल गोटे यांनी संपूर्ण शहरातील वीजवाहिन्या भुमिगत करणे आवश्यक असून वीज वाहिन्या, खांब, डीपींमुळे आधीच अतिक्रमणयुक्त असलेल्या रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होतो़ शिवाय सातत्याने अपघात होत असल्याची भुमिका घेतली़ तसेच गेल्या वर्षी २़५ कोटी रूपयांच्या निधीची मागणी केल्याचेही सांगितले़ शहरात वीज उपकेंद्रांसाठी जागा मिळवून दिल्याची स्पष्टोक्ती आमदार गोटे यांनी केली़.
महापौरांनी आग्रारोडवरील वीजतारा भुमिगत करण्याची मागणी केली होती़ आपण संपूर्ण शहराच्या वीजतारांची समस्या मांडली असून संबंधित कामासाठीचा निधी महावितरणला मिळेल़ मनपाचा संबंध नसून महावितरण हे काम मार्गी लावेल़
- अनिल गोटे,
आमदार, धुळे
ऊर्जामंत्र्यांनी मनपाच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत महावितरणला महापौर व मनपा पदाधिकाºयांशी चर्चा करून डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यासंदर्भात लवकरच बैठक घेणार आहे़ बाकी कुणीही याप्रश्नी पाठपुरावा केलेला नाही़
- कल्पना महाले,
महापौर, मनपा, धुळे