धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 04:56 AM2018-01-31T04:56:42+5:302018-01-31T04:56:53+5:30
औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी स्वत:चे बलिदान देणारे धर्मा पाटील (८०) यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता विखरण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा नरेंद्र पाटील यांनी त्यांना अग्निडाग दिला.
शिंदखेडा (जि. धुळे) : औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी स्वत:चे बलिदान देणारे धर्मा पाटील (८०) यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता विखरण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा नरेंद्र पाटील यांनी त्यांना अग्निडाग दिला.
दोंडाईचा येथे होऊ घातलेल्या वीज प्रकल्पासाठी विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन सरकारने संपादित केली होती. यापोटी त्यांना केवळ चार लाख रुपयांचा मोबदला मिळाला मिळाला. जमिनीचे फेरमूल्यांकन करून वाढीव मोबदला मिळावा यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते थेट मंत्रालयापर्यंत खेटे मारले. मात्र, तरीही त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात न आल्याने वैतागून शेवटी २२ जानेवारी रोजी त्यांनी मंत्रालयात विषप्राशन केले. जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
धर्मा पाटील यांचे पार्थिव विखरण येथे आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील गावकºयांची गर्दी लोटली होती. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह सर्वपक्षीय नेते अंत्यविधीला होते.