‘गण गण गणात बोते’चा दिवसभर जयघोष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:41 PM2019-02-25T22:41:10+5:302019-02-25T22:41:31+5:30
गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा : नागरिकांना भक्तीपूर्ण वातावरणाची दिवसभर अनुभूती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सोमवारी वाडीभोकर रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याने दुपारपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले़ ‘गण गण गणात बोते’ जयघोषाने भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते़ सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांच्या दर्शनासह प्रसादासाठी रांगा लागल्या होत्या़
श्री सद्गुरू गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी पहाटे पाच वाजता गजानन महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक आणि पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी अकरा वाजता अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांच्याहस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष गोपाळ केले व पदाधिकारी आणि शेकडो भाविक उपस्थित होते.
मंदिराच्या प्रांगणात सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उन्हापासून संरक्षणासाठी प्रांगणात मंडप टाकण्यात आलेला होता. दर्शनासाठी महिला व पुरूष यांच्याकरीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याचवेळेस मंदिराच्या आवारात विविध महिला भजनी मंडळांकडून भजनं सादर करण्यात आली़ त्यामुळे भक्तीपूर्ण वातावरण तयार झाले होते़ यानिमित्ताने मंदिरात आंब्याच्या पानांचे मंगल तोरण व झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. तसेच मंदिराच्या बाहेर व आत काढण्यात आलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
प्रकट दिन सोहळ्यासाठी शहरातील सर्व भागातून मंदिराकडे जाणाºया भाविकांमुळे संपूर्ण वाडीभोकर रस्ता परिसरात चैतन्याचे वातावरण होते. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या़
भाकरी अन् पिठल्याचा भाविकांसाठी प्रसाद
महाप्रसादाकरीता १० पोते बाजरीच्या भाकरी, ३ पोते डाळीचे पिठले, पाच पोते तांदळाचा मसाले भात, साडेतीन पोते साखरेची बुंदी व दोन क्विंटल हिरव्या मिरच्यांचा खुडा करण्यात आला. अकरा वाजता श्रींच्या महाआरतीनंतर भाविकांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला़ सायंकाळी उशिरापर्यंत प्रसाद वाटप सुरु होते़ त्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
भजनांमुळे आली कार्यक्रमात रंगत!
मंदिराच्या बाहेरील ओट्यावर सकाळी ११ वाजेपासून जिल्ह्यातील विविध महिला भजनी मंडळांच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, रेणुका भजनी मंडळ, श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ, श्री मुक्ताई भजनी मंडळ, श्री तुळजाभवानी भजनी मंडळ (गोराणे, ता. शिंदखेडा) व श्री एकता भजनी मंडळाच्या महिलांनी सहभाग घेतला होता. संध्याकाळी ६ वाजता चित्रकुट संस्थानचे मंगलनाथ महाराज यांचे प्रवचन झाले. यासह दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी मंदिरात दिसून आली.