१२८ वर्षाची परंपरा असलेला धुळ्यातील "मानाचा खुनी गणपती"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 07:23 PM2023-09-19T19:23:31+5:302023-09-19T19:24:34+5:30
लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केला
राजेंद्र शर्मा
धुळे : लोकमान्य टिळकांची प्रेरणा घेऊन खांबेटे गुरुजींनी धुळ्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. जुने धुळे भोई गल्लीत खांबेटे गुरुजींनी गणपतीची मूर्ती स्थापन केली. हाच गणपती मानाचा गणपती श्री खुनी गणपती म्हणूनही प्रचलित आहे. धुळ्यातील मानाचा गणपती श्री खुनी गणपतीची स्थापन आणि विसर्जनाची मिरवणूक पालखीत निघते. प्रथम खुनी गणपतीची विसर्जनाची मिरवणूक निघाल्यानंतरच मोठ्या गणेश मंडळाचे विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होतात, ही परंपरा आजही कायम आहे. यंदाही परंपरेनुसार श्री खुनी गणपतीची स्थापनेची मिरवणूक पालखीतच निघाली.
लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी १८९५ ला खान्देशात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. लोकमान्य टिळकांची प्रेरणा घेऊन धुळ्यातील खांबेटे गुरुजींनी स्थापन केलेल्या गणपतीची गणेशोत्सवातील मिरवणूक सुरुवातीच्या काळात वादग्रस्त ठरली. कारण स्थापनेच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी येथील गणेशमूर्तीची सवाद्य निघणारी मिरवणूक एका प्रार्थनास्थळाजवळून जात होती. प्रार्थना स्थळाजवळून सवाद्य मिरवणूक काढण्यास काहींनी विरोध केला. त्यातून किरकोळ वादविवाद झाले. दरम्यान, प्रार्थना स्थळाच्या मार्गावरून निघणाऱ्या सवाद्य मिरवणुकीसाठी सरकारकडून परवानगी घेण्यात यावी, असा हकूम तत्कालीन ब्रिटिश प्रशासनाने जारी केला. त्यावरून दोन समाजात मतभेद निर्माण झाले. नंतर सुभाषनगरातील श्रींच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक १ सप्टेंबर १८९५ ला निघाली. मिरवणूक प्रार्थनास्थळाजवळ येताच पुन्हा वाद उफाळले. त्यामुळे दंगल झाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारजण मरण पावले. तेव्हापासून खांबेटे गुरुजींनी स्थापन केलेल्या गणपतीला श्री खुनी गणपती नाव पडले आहे. धुळ्यातील श्री खुनी गणपती हा मानाचा गणपती आहे.
मिरवणुकीत टाळ मृदुंग आणि बारा पावली -
स्थापना आणि विसर्जनाची मिरवणूक ही पालखीत टाळ मृदुंगाच्या गजरात निघते. तसेच पुढे बारा पावली नृत्य करणारे तरुण असतात. मिरवणुकीत कधीही बॅण्ड पथक अथवा डीजेचा वापर आजपर्यंत केला गेलेला नाही.
मिरवणुकीचे स्वागत मुस्लिम बांधवांकडून
शहरातील एकमेव गणपती आहे. ज्याची मिरवणूक प्रार्थना स्थळावरून निघते. त्याठिकाणी मिरवणूक आल्यावर मुस्लिम बांधव फुलांची उधळण करीत मिरवणुकीचे स्वागत करतात. त्यानंतर याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या हस्तेच आरती देखील केली जाते. या सोहळ्यास जिल्हा पोलिस अधीक्षक स्वत: उपस्थित असतात.