खड्डयात वृक्षारोपण करून ग्रामस्थांची गांधिगिरी, वाडी ते नांदर्डे रस्ता खराब असल्याने आंदोलन
By अतुल जोशी | Published: October 2, 2023 05:14 PM2023-10-02T17:14:31+5:302023-10-02T17:15:13+5:30
अतुल जोशी, धुळे : शिरपूर तालुक्यातील वाडी ते नांदर्डे या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, वाहनधारकांना या ...
अतुल जोशी, धुळे: शिरपूर तालुक्यातील वाडी ते नांदर्डे या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने नेताना कसरत करावी लागते. याबाबत संबंधित विभागाला निवेदन देऊनही खड्डे न बुजविल्याने, अखेर ग्रामस्थ व भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे शिरपूर तालुकाध्यक्ष ओंकार पवार यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधत खड्डयांमध्येच वृक्षारोपण करून ‘गांधिगिरी’केली.
शिरपूर तालुक्यातील शिरपूर ते बोराडी दरम्यान असलेल्यावाडी पिरबाबा दर्गा ते नांदर्डे नर्सरी पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र या रस्त्यावरील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप वाहनचालक तसेच स्थानिक ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केला आहे. रस्ता दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करीत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त करीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी रस्त्यावरील खड्ड्यात गांधीगीरी करत खड्डयात वृक्षारोपण केले.
यावेळी पिंटू उर्फ गणेश बडगुजर,संजय पावरा,रविंद्र बंजारा,सुनील पावरा,अक्षय पावरा,सुनिल बंजारा,अनिल पावरा,अक्षय पावरा, आदी उपस्थित होते.