गणेश मूर्तींचे दर ८ ते १० टक्क्यांनी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:33 PM2018-07-30T13:33:51+5:302018-07-30T13:35:25+5:30
मूर्ती तयार करण्यात कारागीर व्यस्त : आतापासूनच बुकिंग फुल्ल
आॅनलाइन लोकमत
धुळे : विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला अजून दीड महिना बाकी आहे. मात्र यावर्षी होत असलेला समाधानकारक पाऊस, आगामी काळात येणाºया निवडणुकांमुळे गणेशोत्सव गेल्या वर्षाच्या तुलनेत जल्लोषात साजरा होण्याचे संकेत आहे. त्यामुळे आतापासूनच काही मूर्तिकारांकडे बुकिंग पूर्ण झालेले आहे. जीएसटीमुळे यावर्षी ८ ते १० टक्क्यांपर्यंत मूर्तींच्या किमतीत वाढ होईल, असे कारागिरांनी सांगितले.
चातुर्मास सुरू होताच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. त्यातच गणेशोत्सवाचे सर्वांनाच वेध लागलेले असतात. यावर्षी हा उत्सव १३ ते २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत साजरा होणार आहे.
गणरायाच्या आगमनाला अजून दीड महिन्याचा अवकाश असला तरी मूर्ती कारागिरांकडे मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आलेला आहे. आता प्लॅस्टर आॅफ पॅरिसद्वारेच मूर्ती तयार करण्यावर भर दिला जात आहे.
बुकिंग पूर्ण
आकर्षक मूर्ती व कार्यकर्त्यांना हवी असलेली मूर्ती कारागिरांकडून तयार करून घेणाºयांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. त्यामुळे शहरातील मूर्ती विक्रेत्यांकडे आतापासूनच मूर्ती विकत घेण्यासाठी बुकिंगला सुरुवात झाली आहे. काही कारागिरांकडे तर मूर्तींची बुकिंग पूर्ण झालेली आहे. ज्यांनी मूर्ती बुकिंग केली त्यांनाच पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले. शहरासह मालेगाव, चाळीसगाव व तसेच लगतच्या गुजरात राज्यातूनही गणेश मूर्ती नोंदणीसाठी कार्यकर्ते शहरात येत असतात.
कच्चा मालाच्या किमती वाढल्या
गेल्या वर्षापासून जीएसटी लागू झाल्यामुळे गणेश मूर्ती साकारण्यासाठी लागणारे प्लॅस्टर आॅफ पॅरिस, रंग, माती, नारळाच्या चुट्ट्या व इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे गणेश मूर्तींच्याही किमती ७ ते १० टक्क्यांनी वाढणार आहे. घरगुती गणपतीच्या मूर्तीपेक्षा मोठ्या गणेश मूर्तींसाठी गणेशभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
भोलाशंकर मूर्तीला मागणी
यावर्षीही मंडळांकडून विविध प्रकाराच्या मूर्तींना मागणी होऊ लागली आहे. त्यात दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा यांच्यासह अल्फा गणेश, रावण वध, श्रीरामाच्या पोजमधील गणेशमूर्तीला मागणी आहे. त्याचबरोबर भोले शंकर रूपातील मूर्तीला मंडळांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे मूर्ती कारागीर गिरीश खरे, संजय खरे यांनी सांगितले.