गौरींचे आज होणार आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:46 AM2019-09-05T11:46:23+5:302019-09-05T11:46:43+5:30
बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी : तीन दिवस सुरू राहणार उत्सव
धुळे : ‘गौरी सोनपालवानं ये’ अशी आर्त साद घालत गुरूवारी अनेक भाविकांच्या घरी गौरींचे (महालक्ष्मी) आगमन होणार आहे. या सणाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. गौरींसाठी विविध आकर्षक दागिनेही महिला वर्गाला खुणावत आहे.
सोमवारी अतिशय जल्लोषात गणरायांचे आगमन झाल्यानंतर त्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे गुरूवारी गौरींचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव व गौरी या दोन्ही सणांमध्ये सर्वात जास्त महत्व सजावटीला असते. त्यामुळे बुधवारी शहरातील बाजारपेठेत गौरीचे मुखवट्यांसोबतच सजावटीच्या साहित्यालाही मागणी होती. महालक्ष्मीसाठी लागणारे विविध प्रकाराचे हार, मुकूट, पूजेचे आकर्षक सामान, वेगवेगळ्या प्रकारचे मखर, विविध प्रकारची तोरणे, अशा विविधरंगी वस्तुंनी बाजारपेठ फुलून गेली होती. मुखवटे ५०० रूपये जोडीप्रमाणे मिळत होते. याशिवाय कमरपट्टा, बाजूमल, नेकलेस, वेणी, गजरा, लक्ष्मीहार, नथमोती, आदी साहित्यांना मागणी होती. डेकोरेशनची फुलमाळ ५० रूपयांपासून २०० रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गौरी-गणपतींसाठी अनेक प्रकारचे आकर्षक दागिने महिला वर्गाला खुणावत होते.
महालक्ष्मीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. त्यामुळे गुरूवारी सकाळी गौरींची विधीवत स्थापना केली जाईल. शुक्रवारी अभ्यंगस्थान करून ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींची विधीवत पूजा केली जाईल. या सणानिमित्त महिला पारंपारिक खेळ खेळण्याची धुळ्यात परंपरा आहे.