गावठाणच्या जागेवरून बाभळे-वाघाडीची ग्रामसभा गाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:03 PM2020-01-30T12:03:04+5:302020-01-30T12:03:46+5:30
शाब्दीक वादाचे रूपांतर झाले हाणामारीत, पोलीस बंदोबस्त
आॅनलाइन लोकमत
सोनगीर (जि.धुळे) :बाभळे-वाघाडी (ता.शिंदखेडा) ग्रुपग्रामपंचायतीची प्रजासत्ताक दिनी रद्द झालेली सभा बुधवारी घेण्यात आली. या ग्रामसभेत गावठाण जागेवर अतिक्रमण असल्याचे सांगता दोन गटांत जोरदार शाब्दिक चकमक झाली. शाब्दीक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही गटाकडून एकमेका विरोधात आरोप-प्रत्यारोप झाल्याने या भागात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.
बाभळे व वाघाडी खुर्द गृप ग्रामपंचायतीची वाघाडी येथे प्रजासत्ताकदिनी ग्रामसभा घेतली होती. मात्र कोरम पूर्ण नसल्याने, त्यादिवशी ग्रामसभा रद्द करण्यात आली. रद्द झालेली ग्रामसभा बुधवारी पुन्हा ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आली. ग्रामसभेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या परवानगीने ग्रामसेवक पी. डी बोरसे यांनी ग्रामसभेला सुरुवात केली.
गावाच्या विकासासाठी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा होत त्यास मंजुरी देण्यात आली. गावेळी बाभळे येथील राजेंद्र पंडित पाटील यांनी बाभळे गावातील गावठाण हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यात यावीत यासाठी तक्रार अर्ज सादर केला. आलेल्या अर्ज सवार्नुमते मंजूर केला. गावठाणला लागून लखन रूपनर यांचा गट आहे. ग्रामपंचायतीने गावठाण हद्द कायम करण्यासाठी भुमी अभिलेख विभागाने हद्द नेमून दिली. परंतु खाजगी जागेत गावठाण जागा निघत असल्याने वादग्रस्त ठरली आहे. ग्रामसभेत जागेवरून दोन्ही गटात शाब्दिक चकमक होत गोंधळ उडाला. ग्रामसभेत धक्काबुक्कीचा प्रकार घडला. पोलिसांनी दोन्ही गटातील जमावाला आवर घातला. वाघाडी येथून जमाव बाभळे गावात गेला असता, त्याठिकाणी दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच भरत पाटील, ग्रामपंचायतसदस्य नाना जामू भिल, हिरकनबाई छगन भिल, सुनंदाबाई अभिमन ठाकरे आदी उपस्थित होते.