पुण्याच्या तरुणाकडून गावठी कट्टा हस्तगत; चार जिवंत काडतुसेही पकडली
By देवेंद्र पाठक | Published: July 3, 2023 05:31 PM2023-07-03T17:31:13+5:302023-07-03T17:31:19+5:30
खामखेडा शिवारातील घटना
धुळे - पुणे येथील एक तरुण गावठी कट्टा घेण्यासाठी सत्रासेन येथे आला होता. कट्टा घेऊन जात असताना तालुक्यातील खामखेडा गावाजवळ त्यास सांगवी पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. गोविंद मुलचंद सोलंकी (वय २९) याला अटक करण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावाकडून सत्रासेन गावाकडे एक इसम चौकटी शर्ट घातलेला असून, त्याची दाढी वाढलेली आहे. हा इसम गावठी कट्टे घेऊन चोपडाकडे जात असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली. माहिती मिळताच पथकासह ते रवाना झाले. खामखेडा गावाच्या पुढे जात असताना सदर संशयित तरुण येताना दिसला. सदर इसमाच्या हालचाली संशयास्प्द वाटल्याने त्यास थांबवून त्याने त्याचे नाव गोविंद मुलचंद सोलंकी (वय २९, रा. छापरी, पो. छोटा टिगरीया, ता. जि. देवास (मध्य प्रदेश), हल्ली मुक्काम अजिंठानगर, निगडी, पिंपरी-चिंचवड पुणे) असे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेस १ गावठी कट्टा मॅगझीनसह व खिशात ४ जिवंत काडतुसे मिळून आली. २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विनापरवाना बेकायदेशीररीत्या कब्ज्यात बाळगताना रंगेहाथ मिळून आला.
दरम्यान, गोविंद सोलंकी हा तरुण पायी येत असताना त्याला सापळा लावून जेरबंद करण्यात आले. त्याला घेण्यासाठी काही मित्र गाडी घेऊन येणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यास पकडले. सदर कट्टा तो पुण्यात विक्री करणार होता. पहिल्यांदाच तो या भागात आला असल्याचे सांगण्यात आले. याबाबत सांगवी पोलिसांत त्याच्या विरोधात आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.