संशयित तरुणाकडून गावठी कट्ट्यासह काडतूस हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By देवेंद्र पाठक | Published: August 1, 2023 06:32 PM2023-08-01T18:32:23+5:302023-08-01T18:32:59+5:30
४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे : देवपुरातील हिम हॉटेलजवळ संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. त्रिशूल रमेश सूर्यवंशी (वय ३२, रा. शारदा नगर, मधुबन बंगल्यासमोर, देवपूर, धुळे) याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
देवपुरातील हिम हॉटेलजवळ एक तरुण गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने सापळा लावून तरुणाला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे जिवंत राऊंड असा ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी गुणवंत पाटील यांच्या फिर्यादीवरून देवपूर पोलिस ठाण्यात त्रिशूल रमेश सूर्यवंशी (वय ३२, रा. शारदानगर, मधुबन बंगल्यासमोर, देवपूर, धुळे) याच्या विरोधात देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मच्छिंद्र पाटील, रविकिरण राठोड, नीलेश पोतदार, सुशील शेंडे, सागर शिर्के, गुणवंत पाटील यांनी ही कारवाई केली.