धुळ्यात चोरीच्या १७ दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:55 PM2018-09-22T22:55:36+5:302018-09-22T22:56:22+5:30
बाभुळवाडीतून तिघे ताब्यात : साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चाळीसगाव रोड पोलिसांच्या शोध पथकाने चोरीला गेलेल्या १७ दुचाकी शोधून काढल्या आहेत़ त्याची एकत्रित ८ लाख ४० हजार इतकी किंमत आहे़ याप्रकरणी धुळे तालुक्यातील बाभुळवाडी येथून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले़
चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला १२ सप्टेंबर रोजी मोटारसायकल चोरीची तक्रार नोंदविण्यात आली होती़ तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक कुबेर चवरे यांनी शोध पथकाला तपासाचे आदेश दिले होते़ त्यानुसार, शोध पथकातील कर्मचाºयांना २० सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना शैलेश दादाभाऊ पाटील (२४, रा़ बाभुळवाडी ता़ धुळे) हा संशयितरित्या फिरताना आढळला़ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ एमएच १८ एएस ०३८६ क्रमांकाची मोटारसायकलही चोरीची निघाल्याने पोलिसांचा संशय बळावला़ शिवाय या कामी अजय उर्फ बंटी गोपीचंद पाटील (२३) आणि राकेश उर्फ भुºया अर्जुन पाटील (२७) या दोघा साथीदारांची नावे समोर आली़ त्यांनाही संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ या तिघांच्या टोळीने विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली़ मिळालेल्या माहितीच्या आधारावर चाळीसगाव रोड पोलिसांनी चोरीच्या १७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत़ त्याची एकत्रित किंमत ८ लाख ४० हजार इतकी आहे़
या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी निघण्याची शक्यता आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश इंदवे, पोलीस कर्मचारी संदिप कढरे, जोएब पठाण, प्रेमराज पाटील, सुशील शेंडे, संदिप खैरनार, हेमंत पवार, शंकर महाजन यांनी ही कामगिरी केली आहे़