धुळ्यात कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:00 PM2018-02-28T15:00:48+5:302018-02-28T15:00:48+5:30
१५ मिनीटे घंटानाद, आंदोलनाला कृषी विभागाचा पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नियोजित कृषी विद्यापीठ हे धुळ्यातच झाले पाहिजे, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात घोषणा व्हावी, या मागणीसाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सुमारे १५ मिनीटे घंटानाद सुरू होता. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना देण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि़ अहमदनगर) या कृषी विद्यापीठाचे विभाजन करुन नव्याने निर्माण होणारे कृषी विद्यापीठ धुळ्यातच झाले पाहीजे, अशी मागणी २००९ या सालापासून धुळे जिल्ह्याने लावून धरली आहे़
कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांकडे महात्मा कृषी विद्यापीठाचे लक्ष नाही. त्यामुळे या भागाचा विकास झालेला नाही. म्हणून खान्देश विभागाकरिता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे. खान्देशातील बराचसा भाग हा कोरडवाहू आहे. त्याकरिता कोरडवाहू पिकांवर संशोधन होणे गरजेचे आहे. जळगाव व धुळे जिल्ह्याचे कापूस हे मुख्यपीक आहे. त्याकरीता स्वतंत्र संशोधन केंद्राची गरज आहे. परंतु महात्मा फुले कृषी विद्यापीठाने यासाठी पाठपुरावाच केला नाही.
दरम्यान शासनाने नेमलेल्या डॉ. एस.वाय.पी. थोरात व डॉ. व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची अंमलबजावणी नुकत्याच सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करून, धुळे जिल्ह्यातच कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा व्हावी अशी मागणी करीत घंटानाद करण्यात आला.
कृषी अधिकाºयांचा पाठिंबा
दरम्यान कृषी विद्यापीठासाठी झालेल्या या आंदोलनाला कृषी विभागानेही पाठिंबा दिला आहे.
यावेळी कृृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक तथा माजी आमदार शरद पाटील, अतुल सोनवणे, धीरज पाटील, भुपेंद्र लहामगे, साहेबराव देसाई, डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.