अवधानला एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी
By Admin | Published: April 6, 2017 12:39 AM2017-04-06T00:39:39+5:302017-04-06T00:39:39+5:30
चोरट्यांचा धुमाकूळ : दुचाकीसह ३१ हजारांचा ऐवज लंपास
धुळे : तालुक्यातील अवधान येथे बुधवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ एका ठिकाणाहून ३१ हजारांचा ऐवज व दुचाकी लंपास केली, तर दोन ठिकाणी चोरट्यांना हाती काही लागले नाही़ याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
मुंबई-आग्रा महामार्गावरील व शहरानजीकच्या अवधान येथील इंदिरानगर परिसरात ६ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजेनंतर चोरट्यांनी शब्बीर रशीद खाटीक व युवराज गणपत सोनवणे यांची घरे फोडली़ मात्र दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही़ त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा परिसरातील मराठी शाळेजवळ राहणाºया बापू मंगा सोनवणे या एसटी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाºयाकडे वळविला़ ते उकाड्यामुळे कुटुंबीयांसह छतावर झोपलेले होते़
ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातून रोख २४ हजार रुपये, ८ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, दोन बँकांचे एटीएम कार्ड चोरले़ जाता जाता चोरट्यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्ऱ एमएच १८-बीबी ०१३१) लंपास केली़
पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बापू सोनवणे यांचा मुलगा झोपेतून उठल्यानंतर त्याला चोरी झाल्याचे लक्षात आले़ त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली़ घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई, सहायक उपनिरीक्षक अशोक रामराजे तसेच श्वानपथक व ठसेतज्ज्ञ पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ याप्रकरणी बापू सोनवणे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत़
डब्यातील दागिने सुरक्षित
चोरट्यांनी घरातील कपाटे, कॉट व बॅगांमध्ये ऐवजाचा शोध घेतला़ त्यात रोख रक्कम व अंगठी चोरून नेली़ मात्र चोरट्यांनी डबे उघडून बघितले नाही़ त्यामुळे डब्यातील सोन्याची मंगलपोत व इतर दागिने सुरक्षित राहिले़