मुलीच्या फिर्यादीवरुन वडीलांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:33 PM2019-04-12T22:33:45+5:302019-04-12T22:34:13+5:30
पत्नीचा केला होता खून : आर्वी येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : घरगुती कारणावरुन पतीने पत्नीचा काठीने मारहाण करत निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आर्वी शिवारात घडली होती़ याप्रकरणी साक्षीदारांच्या साक्षी आणि घटनेचा लावण्यात आलेला तपास यावरुन संशयित पतीला न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी ठोठावली़ सरकारी वकील म्हणून पराग पाटील यांनी कामकाज पाहीले़
धुळे तालुक्यातील आर्वी येथील किसन श्रीपत पाटील यांच्या शेतातील घरात सदाशिव किसन शेणगे (पाटील) हा आपल्या परिवारासोबत राहत होता़ १० जुलै २०१६ रोजी ४ ते साडेचार वाजेच्या सुमारास त्याची पत्नी सुरेखाबाई सदाशिव शेणगे आणि मुलगी प्रिती झोपलेले असताना घरगुती कारणावरुन वाद केला आणि सदाशिव याने पत्नी सुरेखाबाई हिला काठीने मारहाण केली़ यात जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू ओढवला़
याप्रकरणी त्याची मुलगी प्रिती सदाशिव शेणगे (पाटील) हिने धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती़ त्यानुसार सदाशिव किसन शेणगे (पाटील) (४५), सुनील किसन शेणगे (पाटील) (४३) आणि कमलाबाई किसन (पाटील) (६५) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ न्यायाधीश मंगला धोटे यांच्या न्यायालयात या प्रकरणाचे कामकाज पार पडले़ ७ जणांच्या साक्षी तपासण्यात आल्याने त्या महत्वपुर्ण ठरल्या़ तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एम़ के़ बनसोडे यांनी योग्य दिशेने तपास केला़ त्यामुळे साक्षी आणि सादर झालेले पुरावे तपासून न्यायाधीश मंगला धोटे यांनी संशयित आरोपी सदाशिव किसन शेणगे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ आणि पोलीस निरीक्षक भरत जाधव यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले़ पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक आऱ ए़ पवार होते़