शेतकरी, मजुरांना १० हजार रुपये पेन्शन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:05 PM2020-08-12T23:05:50+5:302020-08-12T23:05:59+5:30
शिरपूर : अ.भा. किसान सभा व भारतीय खेत मजदूर युनियनतर्फे तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शेतकरी, शेतमजूर, कारागिरांना दरमहा १० हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा व भारतीय खेत मजदूर युनियनच्यावतीने देशव्यापी जनजागरण मोहिम व आंदोलन करण्यात आले़ याअंतर्गत येथील तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
यासंदर्भात १० रोजी तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले़ त्यानुसार, कोरोना काळातील विज बील माफ करा, सहकारी दुध संघ सुरू करा, साखर कारखाना सुरू करा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या, सूतगिरणीत हमी भावाने कापूस खरेदी करा, कोरोना काळातील शेती व शेतकरी विरोधी काढलेले आदेश मागे घ्या, कांद्याला प्रतिक्विंटल १ हजार रूपये अनुदान द्या, तहसिल कार्यालयात दाखल शेतकऱ्यांची वाटणीची प्रकरणे त्वरीत मंजूर करून वाटणी आदेश काढा़ तसेच शेतकरी, शेतमजूर, कारागिरांना दरमहा १० हजार रूपये पेन्शन द्या, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
तहसीलदारांना निवेदन देतेवेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अॅड़हिरालाल परदेशी, सल्लागार अॅड़मदन परदेशी, शेतमजूर युनियनचे अध्यक्ष अॅड़संतोष पाटील, अर्जून कोळी, रामचंद्र पावरा, दिनेश पावरा, प्रमोद पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते़ यावेळी तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.