कृषी विकास दरात ५ टक्के वाढीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 09:38 AM2018-04-08T09:38:27+5:302018-04-08T09:38:27+5:30

धुळे जिल्हा : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत कृषी विभागाची माहिती 

The goal of growth at 5% | कृषी विकास दरात ५ टक्के वाढीचे उद्दिष्ट

कृषी विकास दरात ५ टक्के वाढीचे उद्दिष्ट

Next
ठळक मुद्देअपेक्षित ५ टक्के विकासदरासाठी अन्नधान्य, भाजीपाला व फळपिकांची उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्टविविध पिकांसाठी ४८ हजार ९७० क्विंटल बियाणे, सुधारित व बिटी कापसाच्या ८.४० लाख पाकिटांची मागणीशेतक-यांना दर्जेदार कृषी निविष्ठा व सुरळीत कर्जवाटपाचे निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : यंदाच्या खरीप हंगामात कृषी विकासाचा दर ५ टक्क्याने वाढविण्यावर भर दिला असून त्यासाठी अन्नधान्य पिकांची उत्पादकता १० टक्के तर भाजीपाला, फळपिकांची उत्पादकता ७ टक्के वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती खरीप हंगाम पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत कृषी विभागातर्फे देण्यात आली. शेतक-यांना पीक कर्जाचा पतपुरवठा सुरळीत व वेळेवर होण्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याबरोबरच, शेतकरी खाजगी सावकाराकडे वळणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. दर्जेदार खते व बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या.
राज्याचे ग्राम विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृहात शनिवारी सकाळी ही बैठक पार पडली. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, कृषी संचालक कार्यालयात नाशिक येथील सामेती प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, प्रांत गणेश मिसाळ, तंत्र अधिकारी विनय बोरसे, अमृत पवार आदी उपस्थित होते. बैठकीस  धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे एकमेव लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल व जिल्ह्यातील अन्य आमदार या बैठकीस अनुपस्थित होते.  
यावेळी कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामाकरिता केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरंभी कृषी विभागाने तयार केलेल्या कापसावरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन विषयक घडीपत्रिका, भित्तीपत्रिका व जलदर्शिका २०१८ चे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. 
गतवर्षी खरीप व रब्बी हंगाम मिळून १ हजार ८० कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र त्या तुलनेत केवळ २९३ कोटी २७ लाख रुपये पीक कर्जाचे वितरण झाले. त्याची टक्केवारी अवघी २७ टक्के आहे, अशी माहिती अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर यांनी दिली. त्यामुळे यंदा कृषी पीक कर्ज वाटपासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. हवामान खात्याने यावर्षी पावसाळा समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यंदा १ हजार १७६ कोटी रु. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शेतकºयांना विनासायास कर्ज कसे मिळेल, असे नियोजन करण्याचे तसेच ते त्यासाठी खासगी सावकारांकडे वळणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
शासनामार्फत राबविण्यात येणा-या स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करून जनजागृती करावी, अशी सूचना आमदार कुणाल पाटील यांनी केली.  
शेतक-यांना देण्यात येणारे अर्थ सहाय्य हे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिकींग करून घ्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री भुसे यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश सांगळे यांनी मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले. उपविभागीय कृषी अधिकारी पी.एम. सोनवणे यांनी आभार मानले. या बैठकीला कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
४.४० लाख हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट 
यंदा खरीप पेरणीसाठी ४.४० लाख हेक्टर क्षेत्राचे लक्षांक निश्चित केला आहे. प्रमुख पिकांखेरीज सरासरीच्या तुलनेत मका व सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. विविध पिकांच्या ४८ हजार ९७० क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविली आहे. कापसाच्या सुधारित वाणाची १ कोटी ७५  लाख पाकिटे व बी.टी. कापसाच्या ६.६५ लाख पाकिटांच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे. १ लाख २ हजार ७१० मे.टन खत पुरवठ्याचे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर असून मागील शिल्लक ८८४२ मे.टन साठ्यासह एकूण १ लाख ११ हजार ५५२ मे.टन खते खरीपासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी दिली.


 

Web Title: The goal of growth at 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.