शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी बाजारात झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:11 PM2020-08-22T17:11:19+5:302020-08-22T17:11:51+5:30
साक्री : प्रशासनाच्या आढावा बैठकीनंतर पुन्हा बाजार समिती आवारात कोरोनाचा विसर
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : साक्री तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत कायदेशीर कारवाईचे आदेश पारित व्हायला एक दिवस उलटत नाही तोच बाजार समितीच्या आवारात शेळ्या-मेंढयांच्या मार्केटमध्ये खरेदी- विक्री करणाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. यावेळेस बहुतांश लोकांनी मास्क लावलेला नव्हते. यामुळेच साक्री तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
गेल्या एक महिन्यात साक्री तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पाचशेच्या आसपास झाली आहे. तालुक्यातील खेडया-पाडयांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी प्रसंगी फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क न लावणाºया लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी साक्री येथील बैठकीत दिले होते. यावेळी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे सुतोवाच केले होते. परंतू दुसºयाच दिवशी साक्री येथील बाजार समितीच्या आवारात शेळ्या-मेंढयांच्या बाजारात शेकडोंच्या संख्येने खरेदी-विक्री करणारे एकत्र आले होते. यात बहुतेक लोकांच्या चेहºयावर मास्क नव्हता किंवा बाजार समितीने कोणतेही सॅनिटायझर तेथे ठेवलेले नव्हते. या गर्दीमध्ये जर कोरोना रुग्ण असेल तर त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. प्रशासनाने कितीही बैठका घेतल्या. परंतू मैदानावर त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर कोरोनाला रोखणे अशक्यच होऊन बसेल. लोकांचे कितीही प्रबोधन केले तरी त्याचा फारसा उपयोग होत असताना दिसून येत नाही. यासाठी प्रशासनाला कठोर व्हावे लागेल, तरच कोरोनाला आटोक्यात ठेवता येईल. अन्यथा तालुक्यात मोठया प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.