देवभाने रस्ता बनला धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:14 PM2019-04-02T12:14:03+5:302019-04-02T12:14:48+5:30
वाहनधारक त्रस्त : पुलाजवळच खडी टाकण्यात आल्याने वाढले अपघात
कापडणे : कापडणे ते देवभाने रस्त्यावर खोकरहट्टी या भागाकडे जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या पुलाचे काम करण्यात आले. मात्र, अनेक दिवसांपासून येथे उर्वरित कामे अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आली आहे. पुलावरच बांधकामासाठी लागणाऱ्या खडीचा थर पडलेला असून यामुळे येथे अपघाताच्या घटना घडत आहेत.
पुलाचे काम होऊन बºयाच दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, तरीही येथील परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली नाही. पुलाच्या उत्तर - दक्षिण भागात खोदलेल्या मातीच्या चाºया, मातीचे ढिगारे, तसेच पश्चिम पूर्व भागात अस्ताव्यस्त टाकण्यात आलेली खडी जैसे थे पडून आहे. खडी रस्त्यावर टाकून बरेच दिवस उलटले. मात्र, या खडीवर रोलर फिरवून डांबर टाकून ती खडी झाकण्यात आलेली नाही. रस्त्यावर सर्वत्र खडीचा खच साचल्याने वाहनधारकांना अक्षरश: कसरत करीत या पुलावरून जावे लागत आहे.
वाहनधारकांचे थोडे जरी लक्ष विचलित झाले तरी येथे टाकण्यात आलेल्या खडीमुळे वाहने घसरतात. यामुळे येथे लहान- मोठ्या अपघातांची मालिका सुरू झालेली आहे. या खडीवरून दुचाकी चालवीत असताना तोल जाऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. देवभाने- कापडणे या रस्त्यावर दररोज हजारो लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते.
पुलाचे उर्वरित काम तात्काळ काम पूर्ण करावे, अशी मागणी कापडणे येथील रिक्षाचालक भरत पाटील, विकास बोरसे, बबलू पाटील, दीपक पाटील, लोटन पाटील, राजेंद्र चौधरी, महेंद्र माळी, सुनील गुरव, मच्छिंद्र गुरव, योगेश गुरव, अरविंद पाटील, काशिनाथ झाल्टे, सुभाष झाल्टे, समाधान झाल्टे, प्रभाकर निंबा पाटील, प्रकाश पंडित माळी, किशोर नवल पाटील, कैलास नागरे, रवींद्र पानसरे, दिनेश माळी ,रवींद्र माळी, साईनाथ आप्पा, प्रकाश दिलीप पाटील आदींनी केली आहे.
पुलाचे काम बºयाच दिवसांपासून झाले असले तरी त्यावर दोन्ही बाजूला संरक्षण कठड्याचे बांधकाम अद्यापही करण्यात आलेले नाही. पुलाच्या पश्चिम, पूर्व दिशेला दिशादर्शक फलक अद्यापही उभारण्यात आलेले नाही. रस्त्यावर खडीचा थर पडून आहे. येथील उर्वरित कामे त्वरित करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांनी केली आहे.