गावाबाहेर जाताय़... कुलूपबंद घर सांभाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:39 AM2021-09-27T04:39:20+5:302021-09-27T04:39:20+5:30
धुळे : नागरिकांनाच आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. घर बंद करुन बिनधास्तपणे बाहेरगावी निघून जाण्यापेक्षा घर ...
धुळे : नागरिकांनाच आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. घर बंद करुन बिनधास्तपणे बाहेरगावी निघून जाण्यापेक्षा घर सांभाळण्यासाठी घरी कोणाला तरी राहू देणे आवश्यक झाले आहे. वाढणाऱ्या चोऱ्या लक्षात घेता पोलिसांवर जबाबदारी टाकण्यापेक्षा कुलूपबंद असलेले आपले घर आपणच सांभाळायला हवे.
घरातील सदस्य कुठे गावात जाणे, अथवा बाहेरगावी गेल्यास घराला कुलूप लावले जाते. त्याचा फायदा भुरट्या चोरांकडून घेतला जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. काही ठिकाणी तर हे भुरटे चोर दिवसा रेकी करुन ठेवत असतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. चोरी, घरफोडी ही लागलीच होत नाही. त्यामुळे कोण आपल्या कॉलनीत वारंवार फिरत आहे हेदेखील नागरिकांनी पाहण्याची आवश्यकता आहे. रात्रीच्या वेळेस तर कधी दिवसा पोलीस आपली गस्त घालत असतात. पण आपणही आपल्या घरी चोरी होऊ नये, यासाठी लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. काही नागरिकांकडून घरातच पैसे, दागिने ठेवले जातात. असे न करता ते बँकेतील लॉकरमध्ये ठेवायला हवेत. नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे संरक्षण आपणच करायला हवे.
आठ महिन्यात ८९ घरफोड्या
- गत आठ महिन्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी चोऱ्या झाल्या असल्यातरी ८९ घरफोड्या झालेल्या आहेत. घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
- आपण घराला कुलूप लावून कुठे गेलो असल्यास आपल्या घराची काळजी आपणच घ्यायला हवी. त्यासाठी दुसऱ्या कोणावर विसंबून राहायला नको.
- पोलिसांची गस्त ही वेळोवेळी सुरु असलीतरी चोरटेसुध्दा सक्रिय झाले असल्याचे म्हणावे लागेल. पोलिसांना पाहताच चोरटेदेखील लपून जात असावे.
दोन घटनांचा अजूनही
तपास सुरु
- शहराच्या मध्यभागी असलेले धुळे प्रांताधिकारी आणि पोलीस निरीक्षकांचे घर चोरट्यांनी फोडून तपासाचे आव्हान उभे केले आहे.
- याशिवाय साक्री उपविभागाचे उपअधीक्षक यांचेदेखील निवासस्थान चोरट्यांनी लक्ष केले होते. या घटनेनंतर चोरट्यांचा तपास सुरु आहे.
अनलॉकनंतर चोऱ्या वाढल्या
- कोरोनाचा काळ सुरु झाल्यानंतर सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. प्रत्येक जण घरीच असल्याने चोऱ्यांचे प्रमाण तसे कमी होते.
- आता कोरोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा चोरटे सक्रिय झाले असल्याचे घडणाऱ्या घटनांवरुन समोर येत आहे.
कोणत्या वर्षात किती चोऱ्या
२०१९ : ५१७
२०२० : ३८९
२०२१ : ३९३