राजकारण्यांसाठी ‘धुळे’ शुभशकून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 10:55 PM2019-03-03T22:55:10+5:302019-03-03T22:55:33+5:30

धुळे : दिग्गजांच्या सभेतून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला

Good luck in politics for Dhule | राजकारण्यांसाठी ‘धुळे’ शुभशकून 

राजकारण्यांसाठी ‘धुळे’ शुभशकून 

Next

- राजेंद्र शर्मा
गेल्या १५ दिवसात भाजपतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर काँग्रेसतर्फे पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी या दोन दिग्गज नेत्यांनी महाराष्टÑात धुळ्यात पहिली सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजविला. दोन्ही सभा मोठ्या आणि ‘रेकार्ड ब्रेक’ झाल्यात. कोणाची सभा मोठी झाली, यासंदर्भात राजकीय नेत्यांकडून दावे - प्रतिदावे होतील आणि सुरुच राहतील. परंतू या दोन्ही सभांमुळे देशातील दोन प्रमुख पक्षांच्या दृष्टीकोणातून ‘धुळे ’ हे किती महत्वाचे आहे, याची प्रचिती  आली. या दोन्ही सभांमुळे धुळेकर जनतेला राजकीय विचारांची चांगली मेजवाणी मिळाली. 
भाजपच्या दृष्टीकोणातून विचार केला तर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे केंद्रात धुळ्याचे प्रतिनिधीत्व करतात. डॉ.भामरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथील आतंकी हल्याच्या घटनेनंतर लगेच दोन दिवसातच ही सभा होती. त्यामुळे ती रद्द होण्याची चर्चा होती. परंतु ती चर्चा फोल ठरवित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात येऊन धुळेकरांचे स्वप्न असलेल्या मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेमार्गाच्या कामात पहिल्या टप्प्यात होणाºया धुळे - नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ केला. तसेच सुलवाडे - जामफळ - कनोली या सिंचन योजनेसहीत विविध विकास कामांचे उद्घाटन केले. या सभेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दृष्टीकोणातून धुळे लोकसभा मतदारसंघाचे किती महत्व आहे, हे स्पष्ट केले. सोबतच मतदारसंघातील भाजप उमेदवारासंदर्भात सुरु असलेल्या उलटसुलट चर्चेला एकप्रकारे पूर्णविराम देत लोकसभा निवडणूक प्रचाराचा  शुभारंभ केला. सभेला उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील भाजपचे दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते. या सभेमुळे भाजपच्या दृष्टीकोणातून धुळे मतदारसंघ किती महत्वाचा आहे, हे स्पष्ट झाले.
काँग्रेसने देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर अवघ्या १५ दिवसाच्या आत २ मार्चला पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष तथा खासदार राहूल गांधी यांची धुळयात प्रचार सभा आयोजित केली. या सभेला काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रदेश प्रभारी मल्लिकार्जून खरगे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह खान्देशातील पक्षाचे प्रमुख नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव ठाकरे, आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह आजी, माजी मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेसने देखील भाजप प्रमाणेच महाराष्टÑात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ धुळ्यातूनच केला. सभेत पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष व खासदार राहूल गांधी यांनीही धुळ्याचा उल्लेख आपल्या भाषणातून करीत पक्षाच्या दृष्टीकोणातून धुळ्याचे महत्व किती आहे, हे स्पष्ट केले. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी देखील आपल्या भाषणातून धुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या यशाच्या परंपरेचा उल्लेख केला व त्यामुळेच पक्षाने धुळ्यातून प्रचाराचा शुभारंभ केल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसतर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा उल्लेख करीत पक्षातर्फे त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. तसेच याआधीही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत धुळे लोकसभेसाठी रोहिदास पाटील यांचेच नाव पाठविल्याचे स्पष्ट केले आहे.
धुळ्यातील या दोन्ही सभांमुळे काँग्रेस - भाजप पक्षाच्या नेते मंडळींच्या दृष्टीने ‘धुळे’ लोकसभा मतदारसंघाची जागा ही किती महत्वाची व प्रतिष्ठेची आहे, हे स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या दृष्टीकोणातून गेल्या १० वर्षापासून मतदारसंघात असलेली सत्ता अबाधित ठेवायाची आहे. तर काँग्रेसला १० वर्षापूर्वीची धुळ्याची काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याची ओळख परत मिळवायची आहे. तसेच येथूनच दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी राज्यातील  आपल्या प्रचाराची सुरुवात केल्याने मतदारसंघातील निवडणूक ही दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे आता देशासह संपूर्ण राज्याचेच लक्ष धुळे मतदारसंघाकडे लागल्याने याठिकाणी लोकसभा निवडणुकीची होणारी लढत रंगतदार आणि चुरशीची ठरणार आहे, हे त्यावरुन स्पष्ट झाले आहे. एरव्ही खून, दंगलीसाठी कुप्रसिद्ध असलेले ‘धुळे’ आता लोकसभा निवडणुकीमुळे राजकारणातही अव्वल असल्याचा आनंद आहे. मात्र, जसे राजकारण्यांच्या दृष्टीने प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी ‘धुळे’ शुभशकुन ठरतो, तसेच धुळ्याच्या सर्वांगिण विकासासाठीही हा ‘शुभशकुन’ ठरावा, अशी धुळेकरांना अपेक्षा आहे.

Web Title: Good luck in politics for Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे