विमा कवच मिळाले, कायमस्वरूपी सेवेची मात्र प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:30 AM2021-05-03T04:30:32+5:302021-05-03T04:30:32+5:30
धुळे - कोविड केअर केंद्रात कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मागील काही काळापासून विमा कवच मिळाले नव्हते. मात्र या कर्मचाऱ्यांना ...
धुळे - कोविड केअर केंद्रात कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मागील काही काळापासून विमा कवच मिळाले नव्हते. मात्र या कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळाल्याचे पत्र प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे मात्र सेवेत कायम करून घेण्याची त्यांची मागणी अजूनही स्वीकारण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडू लागली होती. त्यामुळे कंत्राटी स्वरूपात आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी पहिल्या लाटेतही आपले कर्तव्य बजावले होते. मात्र लाट ओसरल्यानंतर त्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली नव्हती. मात्र जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली. तसेच कोविड केअर केंद्र व तेथील बेड अपुरे पडू लागले होते. तसेच आरोग्य कर्मचारीही अपुरे पडू लागले होते. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली. यावेळी मात्र त्यांना विमा कवच न मिळाल्याने त्यांची धाकधूक वाढली होती. मात्र अखेर त्यांना विमा संरक्षण मिळाल्याचे स्पष्ट झाले. ५० लाखांचे विमा कवच कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. २८ एप्रिल रोजी त्याबाबतचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहे. मात्र सेवेत कायम करून घ्या अशी मागणी कंत्राटी कर्मचार्यांनी केली आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर -
केवळ तीन महिन्यांचे नियुक्ती आदेश मिळत असल्याने कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्या मध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
तीन महिन्यांचे कंत्राट -
कोविड केअर केंद्रात कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे कंत्राटी नियुक्ती आदेश मिळाल्याची माहिती मिळाली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही सुरुवातीला तीन महिन्यांसाठी त्यांना नियुक्ती मिळाली होती. त्यानंतर नियुक्ती पुन्हा वाढवण्यात आली होती. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. आता मात्र बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना नियुक्ती मिळाली आहे. तसेच विमा कवचही मिळाले आहे. मात्र सेवेत कायम करण्याची त्यांना प्रतीक्षा आहे.
शासकीय सेवेत सामावून घ्या -
कोरोनाच्या कठीण काळात सेवा देत असल्याने शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या तीन महिन्यांसाठी तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नियुक्ती मिळणार नाही अशी भीती या कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे तात्काळ सेवेत सामावून घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते आहे.
आतापर्यंत ६ जण पॉझिटिव्ह -
कंत्राटी आरोग्य कर्मचारी कोविड कक्षात सेवा देत असल्याने त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. आतापर्यंत सहा आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. पहिल्या लाटेत चार तर दुसऱ्या लाटेत दोघांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळाली. मात्र उपचारानंतर सर्व आरोग्य कर्मचारी बरे झाले आहेत. मात्र कुटुंबातील सदस्यांना भीती वाटत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया -
कोरोनाच्या काळात सेवा देतो आहोत. त्यामुळे कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अशी आमची मागणी आहे. विमा कवच मिळाले आहे. आता सेवेत कायमस्वरूपी घेण्याच्या मागणीचाही सकारत्मक विचार शासनाने केला पाहिजे.
- कंत्राटी कर्मचारी, धुळे
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा नियुक्ती मिळाली आहे. धुळे शहरातील कोविड केअर केंद्रात सेवा देत आहे. केवळ तीन महिन्यांची नव्हे तर कायमस्वरूपी नियुक्ती द्यायला हवी.
- कंत्राटी कर्मचारी धुळे
कोविड वॉर्डमध्ये वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत असून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करीत आहे. कोविड वॉर्ड मध्ये काम करत असल्याने कुटुंबाला भीती वाटते. शासनाने आम्हाला कायम स्वरूपी सेवेत घ्यावे.
- कंत्राटी कर्मचारी, शिरपूर
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर्स - १४
एकूण कर्मचारी - १८६०
कंत्राटी कर्मचारी - ४२८