‘शिटी’ चिन्हासाठी दाखल याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:32 PM2018-11-29T22:32:03+5:302018-11-29T22:36:01+5:30
धुळे महापालिका निवडणूक : आमदार गोटेंच्या उमेदवार वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणुकीत गुरुवारी प्रभाग १२ मधील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. दरम्यान, आमदार अनिल गोटे यांच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून चौकशीचे काम सुरु असल्याची माहिती देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली. दरम्यान, ‘शिटी’चे चिन्ह मिळविण्यासाठी दाखल याचिका औरंगाबाद खंडपिठाने फेटाळून लावली
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग १२ अ मधील उमेदवार बिनविरोध निवडून आल्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरु होती. म्हणून संपूर्ण प्रभागातील उमेदवारांच्या चिन्ह वाटपची प्रक्रिया लांबली होती. त्यानुसार गुरुवारी प्रभागाच्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. प्रभागाची पुढील निवडणूक प्रक्रिया ही आधी घोषित कार्यक्रमानुसारच होणार आहे.
‘शिटी’संदर्भातील याचिका फेटाळली निवडणुकीत लोकसंग्राम पक्षाच्या सर्व उमेदवारांना शिटी चिन्ह द्यावे या मागणीसाठी आमदार अनिल गोटे यांनी खंडपिठात याचिका दाखल केली होती. खंडपिठाने ती याचिका गुरुवारी फेटाळून लावली. त्यामुळे आता आमदार अडचणीत सापडले आहे. कारण त्यांच्या लोकसंग्रामच्या तीनच उमेदवारांना शिटीचे चिन्ह मिळाले आहे. अन्य उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. यामुळे प्रचारात अनेक अडथळे निर्माण होणार आहे. तसेच लोकसंग्रामच्या प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेही अद्याप आमदार गोटे यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.
अद्याप गुन्हा दाखल नाही
दरम्यान, आमदार अनिल गोटे यांचा हत्येचा कट केल्याप्रकरणी व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमधील संभाषणाची चौकशी करण्यासाठी बुधवारी रात्री पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु गुरुवार सायंकाळपर्यंत यासंदर्भात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी अद्याप सुरु असल्याची माहिती देवपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी ‘लोकमत’ला मोबाईलवरुन दिली.
आमदार अनिल गोटे मुंबईतच
पक्षाने मराठा आरक्षणचे विधेयकासाठी सर्वच आमदारांना विधानसभेत उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप काढले होते. त्यामुये आमदार अनिल गाटे हे बुधवारपासून मुंबईत आहेत. बुधवारी त्यांनी विधानसभेत भाषण करतांना धुळ्यातील गुन्हेगारीसंदर्भात वक्तव्य भाजपला घरचा आहेर दिला होता.गुरुवारीसुद्धा आमदार गोटे हे मुंबईत तळ ठोकून होते.